नाशिक- कोरोनामुळे महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नावर सुमारे तीस टक्के परिणाम होणार आहे. त्यामुळे तीस टक्के अनावश्यक कामांना कात्री लावण्याबरोबरच शासनाच्या मुद्रांक सलवत योजनांच्या धर्तीवर महापलिका देखील विविध योजना राबवून उत्पन्न वाढविणार असल्याची माहिती आयुक्त कैलास जाधव यांनी दिली. जुने बिटको रूग्णालय हे केवळ संसर्गजन्य रोगांसाठीच आरक्षीत करण्यात येणार आहे. त्याच बरोबर याठिकाणी पीजी कोर्स सुरू करण्यवर भर असल्याचेही आयुक्तांनी सांगितले.कोरोनामुळे कर वसुलीवर मोठा परीणाम होत आहे. घरपट्टी आणि पाणी पट्टी वसुल करताना एकंदरच नागरीकांची आर्थिक स्थिती बघता फार सक्ती करता येत नाही. त्यातच मनुष्यबळ हे कोरोना संदर्भातील कामांकडे वळविण्यात आले आहे.या सर्वांचाच परीणाम महापालिकेच्या नियोजनावर होत आहे. त्या पार्श्वभूमीवर नियोजन करताना तीस टक्के आता अत्यंत आवश्यक नसलेल्या कामांना कात्री लावण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे सवलती जाहिर करून प्रलंबीत उत्पन्न वाढीवर भर देण्यात येणार आहे. राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात सवलत दिल्याने आता बांधकाम क्षेत्राला चालना मिळाली आहे. अनेक बांधकाम व्यवसायिक डिसेंबर पर्यंत असलेल्या मुद्रांक शुल्कातील चार टक्के सवलतीचा लाभ घेण्यास उत्सूक आहेत. अशाच पध्दतीने काही सवलत योजनांचेनियोजन करण्यावर भर असणार आहे, असेही आयुक्त म्हणाले. नवीन भांडवली कामांपेक्षा काही सध्याची कामे योग्य पध्दतीने करण्यावर भर आहे. विशेषत: रस्त्यांची सध्या डागडूजी करण्यात येणार असून नवीन कामांबाबत टिकावू कामे करण्यावर भर असेल असेही ते म्हणाले.दरम्यान, महापालिकेच्या वतीने वैद्यकिय क्षेत्रातील मनुष्यबळाची उणिव भरून काढण्यासाठी बिटको रूग्णालयात पीजी शिक्षणक्रम सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे ज्यादा डॉक्टर्स उपलब्ध होतील.त्याच प्रमाणे जुने बिटको रूग्णालय हे केवळ संसर्ग जन्य आजारांसाठीच राखीव ठेवण्यात येणार असल्याचेही आयुक्त म्हणाले.गोदाकाठ सुशोभिकरणाचा आयुक्तांचा संकल्पनाशिकमध्ये सूत्र स्विकारल्यानंतर आता कारकिर्दीच्या दोन ते तीन वर्षातील संकल्प आयुक्त कैलास जाधव यांनी स्पष्ट केले. नाशिकला नैसर्गिक देणगी लाभलेल्या गोदावरी नदीच्या शुध्दीकरण व सुशोभिकरणावर भर देण्यात येणार आहेत. नागरीकांच्या यासंदर्भातील काही सूचना असतील तर त्याचे स्वागत आहे. देशात गोदावरीचा लौकीक वाढावा यादृष्टीने नियोजन करण्यात येणार आहे. तर दुसरा संकल्प आरोग्य आणि वैद्यकिय व्यवस्था सक्षमीकरण करण्यावर आयुक्तांचा भर आहे. त्याअंतर्गत बिटको रूग्णालयात सुविधा देतानाच नवीन शिक्षणक्रम सुरू करण्यात येणार आहेत. तसेच टेलीमेडीसीन सुरू करण्यात येणार असल्याचेही आयुक्तांनी सांगितले.