कळवण : आद्य स्वयंभू शक्तिपीठ श्री सप्तशृंगी देवीच्या गडावर सुरू असलेल्या नवरात्रोत्सवात सोमवारी पाचव्या माळेला भगवतीची पंचामृत महापूजा शिवसेनेचे महाराष्ट्र विधीमंडळ अंदाज समीतीचे प्रमुख आमदार अनिल कदम यांच्या हस्ते करण्यात आली. सोमवारी सकाळी ७.३० वाजता सप्तशृंगी देवीवर सुवर्ण अलंकार अर्पण करण्यात आले. पुरोहितांच्या मंत्रघोषात सकाळी ८ वाजता देवीची महापूजा करण्यात आली. दुपारी १२ वाजता देवीची पंचामृत महापूजा करण्यात येऊन हजारो भाविकांच्या उपस्थितीत देवीची महाआरती करण्यात आली. पहिल्या माळेपासूनच भाविकांचा सुरू झालेला ओघ पाचव्या माळेलादेखील वाढता दिसून आला. पाचव्या माळेला ४० हजार देवीभक्त देवीच्या चरणी नतमस्तक झाले. देवीभक्तांमधील उत्साहामुळे गडावर चैतन्याचे वातावरण पसरले आहे. दैनंदिन अलंकार पूजा, मिरवणूक व पूजन आदी विधीदेखील चैतन्यपूर्ण वातावरणात व भक्तगणांच्या उपस्थितीत पार पडत आहे.गडावर येणाºया भाविकांमध्ये तरुणाईचा मोठ्या प्रमाणावर उत्साह दिसून येत आहे. नांदुरी ते गड या घाट रस्त्यावर निर्माण झालेले धबधबे पर्यटकांचे लक्ष वेधून घेत असल्याने या ठिकाणी सेल्फी काढण्याचा मोह भक्तगणांना होत असल्याचे पाहता घाट व वळणरस्त्यावर उतरून कुठेही सेल्फी न घेण्याचे, तसेच भाविकांनी स्वत:बरोबर इतरांचीही काळजी घेण्याचे आवाहन उपविभागीय महसूल अधिकारी अर्जुन श्रीनिवास यांनी केले आहे. दुपारचे कडक ऊन, रात्रीचा गारवा अशा वातावरणात भाविकांची दर्शनासाठी गर्दी केली आहे.फ्यूनिक्युलर ट्रॉली सुरू करण्याची मागणीच्नाशिक : सप्तशृंगगडावर सध्या नवरात्रोत्सव सुरू असून, ज्येष्ठ नागरिक व महिलांसह भाविकांना या काळात गडाच्या पायºया चढून जावे लागू नये, म्हणून तत्काळ गडावर सुस्थितीत असलेली फ्यूनिक्युलर ट्रॉली (रोप-वे) सुरू करावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य डॉ. भारती पवार यांनी जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन् यांना एका निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, गडावर फ्यूनिक्युलर ट्रॉली अद्याप सुरू झालेली नाही. वयोवृद्ध व अपंग भक्तांना यात्रा कालावधीत देवीच्या दर्शनासाठी मंदिरापर्यंत जाता यावे यासाठी फ्यूनिक्युलर ट्रॉलीची चाचणी घेऊन तत्काळ सुरू करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
पाचव्या माळेला ४० हजार भाविक देवीचरणी नतमस्तक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 1:21 AM