नाशिक : मार्च महिन्याच्या प्रारंभी अर्थात १ मार्चला बाधित संख्या अवघी १४० तर २४ मार्चला बाधित संख्येत ३० पट वाढ होऊन ३३३८ वर पोहोचली आहे. कोरोनाने सर्वाधिक कहर गत ८ दिवसात गाठला असून या आठ दिवसांमध्ये कोरोनाचे तब्बल २० हजार ५७९ रुग्ण बाधित झाले आहेत.
मार्च महिन्यात कोरोनाने अक्षरश: विस्फोट घडवलेला असून कोरोना प्रसाराचा वेग कल्पनेच्या पलीकडे असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा केवळ दर्शक झाल्यासारखे चित्र आहे. कोरोना प्रसाराच्या वेगात आठवड्या-आठवड्यात होणारी वाढ ही संपूर्ण यंत्रणेला चक्रावून सोडणारी आहे.
इन्फो
१७ मार्चला ओलांडला दोन हजारांचा टप्पा
गत आठवड्यात बुधवारी प्रथमच कोरोनाबाधितांच्या आकड्याने दोन हजारांचा टप्पा ओलांडला होता. त्याआधीच्या आठवड्यात बाधितांचा आकडा हजार ते दीड हजार होता. तर त्यापूर्वीच्या आठवड्यात हा आकडा पाचशे ते सहाशेदरम्यान होता. अवघ्या दोन आठवड्यात कोरोनाने वाढीचा महाभयानक वेग गाठला आहे. गत बुधवारी २१४६ पर्यंत मजल गाठल्यानंतर गुरुवारी २४२१ पर्यंत बाधितांच्या आकड्याने मजल मारली होती. तर शुक्रवारी त्यापेक्षाही अधिक म्हणजे २५०८ बाधित, शनिवारी २३८३ बाधित, रविवारी २३६०, सोमवारी २७७९ तर मंगळवारी २६४४ रुग्ण बाधित आढळून आले होते. या वेगाने जिल्ह्याची वाटचाल अत्यंत भयप्रद दिशेने सुरू झाल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.
इन्फो
मार्च महिन्यात तब्बल ५ टप्पे
मार्च महिन्याच्या अवघ्या चार आठवड्यात कोरोनाने त्याच्या विस्फोटाचे ५ टप्पे दाखवले आहेत. महिन्याच्या प्रारंभी १ मार्चला कोरोनाचे अवघे १४० बाधित तर तर आठवड्याच्या अखेरीस त्यात चौपट वाढ होऊन ७ मार्चला ५६३ बाधित रुग्ण होते. दुसऱ्या आठवड्यात १४ मार्चला बाधित संख्या १३५६ वर पोहोचली तर २१ मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात हा आकडा २३६० असा अनेक पटीत वाढत गेला आहे. त्यानंतर अवघ्या तीन दिवसात २४ मार्चला बाधितांच्या आकड्याने ३ हजारांचा आकडा ओलांडून ३३३८ पर्यंत पोहोचल्याने कोरोनाने महिन्याच्या प्रारंभापासून आतापर्यंत तब्बल ५ टप्पे गाठले आहेत.
--------------
या स्टोरीला ग्राफ घ्यायचा आहे. सपकाळे साहेबांकडून.