नाशिक : त्र्यबंकेश्वर येथे कुंभमेळ्यासाठी दहा कोटी रुपयांचीही कामे झाली नसल्याचा दावा विविध आखाड्यांच्या महंतांनी केला असला तरी प्रत्यक्षात मात्र त्र्यंबकेश्वर येथे तब्बल हजार ते अकराशे कोटी रुपयांची कामे होत आहे. केवळ पाणीपुरवठा योजनेसाठीच १५ कोटी रुपये देण्यात आले आहेत, तेथे दहा कोटींची कामे झालीच नाहीत असे म्हणण्यास काय अर्थ असा सवाल प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे. नाशिक - त्र्यंबकेश्वर रस्त्याचे काम तब्बल दोनशे कोटी रुपयांचे काम सुरू आहे, हे काम कोणासाठी सुरू आहे. असा सवालही उपस्थित झाला आहे. त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा भरत असताना तेथे राज्य सरकार आणि प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप तेथील साधु-महंतांनी केला आहे. त्यापार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता तातडीने त्र्यंबकेश्वर येथे महंतांच्या उपस्थितीत कुंभमेळा पूर्वतयारी बैठक आयोजित करण्यात आली आहे. कुंभमेळ्यासाठी किती कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहेत आणि त्यापैकी किती कोटी रुपयांची कामे सुरू आहेत याची सर्व माहिती प्रशासनाच्या वतीने तयार केली जात असल्याचे वृत्त आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील कुंभमेळ्यासाठी दोन हजार ३७८ कोटी रुपयांच्या कामांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे, त्यापैकी त्र्यंबकेश्वरसाठी तब्बल हजार ते अकराशे कोटी रुपयांची कामे होत आहेत. त्यातील गौतमी गोदावरीतून त्र्यंबकेश्वरसाठी पाणीपुरवठा करणारी योजना सुमारे तीस कोटींची असून, त्यातील १५ कोटी रुपये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला देण्यात आले आहेत. त्र्यंबकेश्वर रस्ता दोनशे कोटी रुपयांचा आहे.
त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्यासाठी कोट्यवधींची कामे
By admin | Published: February 10, 2015 1:19 AM