अझहर शेख, नाशिक : भारतीय सैन्यदलात स्त्री शक्ती कोठेही मागे नाही. तीनही सैन्यदलात नारी शक्ती विविध मोठ्या पदांवर स्वत:ला सिद्ध करत आहेत. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये (एनडीए) मुलींना जाण्याची संधी केंद्र सरकारने उपलब्ध करून दिली आहे. या संधीचे सोने करण्यासाठी राज्यातील मुलींना सैनिकी सेवा पूर्व शिक्षण देण्याकरिता पहिली संस्था नाशिकमध्ये सुरू करण्यात आली आहे, ही संस्था भविष्यात मैलाचा दगड ठरणार आहे, असा आशावाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
नाशिकमध्ये त्र्यंबकरोड येथे राज्यभरातील मुलींसाठी खास सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था जिल्हा प्रशासनाने नियोजन समितीतून मिळालेल्या निधीद्वारे तयार केली आहे. याठिकाणी पहिल्या सत्रात ३० मुलींना शिक्षण दिले जाणार आहे. या संस्थेचे लोकार्पण शनिवारी (दि.१५) करण्यात आले. याप्रसंगी एकनाथ शिंदे प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. याप्रसंगी व्यासपिठावर उपमुख्यमंत्री अजीत पवार, जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, उर्जामंत्री उदय सामंत, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, खासदार हेमंत गाेडसे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू सेवानिवृत्त लेफ्टनंट माधुरी कानिटकर, शिक्षण संस्थेच्या संचालक मेजर सय्यदा फिरातुन्नीसा बेगम, धावपटू कविता राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शिंदे म्हणाले, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर या शहरांपासून जवळ असलेल्या नाशिकनगरीत मुलींसाठी सैनिकी शिक्षण देणारी राज्यस्तरीय पहिली संस्था सुरू होणे ही मोठी अभिमानाची बाब आहे. या संस्थेत आवश्यक त्या भौतिक सोयीसुविधांसाठी लागणारा निधी राज्य सरकार कधीही अपुरा पडू देणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. प्रास्ताविक शिक्षण संस्थेच्या संचालक मेजर सय्यदा फिरातुन्नीसा बेगम यांनी केले.
३० मुलींची पहिली बॅच!
राज्यभरातून आलेल्या ४ हजार विद्यार्थिनींच्या अर्जांमधून लेखी परीक्षेद्वारे १५० मुलींची प्रवेशाकरिता अंतीम मुलाखतीसाठी निवड करण्यात आली. मुलाखतीत यशस्वी झालेल्या विद्यार्थिनींपैकी ३० मुलींची अंतीम निवड पहिल्या बॅचकरिता केली गेली, अशी माहिती चालक मेजर सय्यदा फिरातुन्नीसा बेगम यांनी यावेळी दिली.