नाशिकरोड : नाशिक-पुणे महामार्गावरील नेहरूनगर येथील बाळ येशू यात्रा कोरोना संकटामुळे यावर्षी ऑनलाईन भरविण्यात येणार असल्याची माहिती देवस्थानच्या सूत्रांनी दिली. त्याबाबतचे माहिती फलक मंदिर परिसरात लावण्यात आले आहेत. भाविक यात्रेपासून वंचित राहू नये म्हणून श्राईन ऑफ दि इन्फन्ट ही लिंक भाविकांना पाठविण्यात आली असून त्यावर १३ फेब्रुवारीपर्यंत मराठी, इंग्रजी, कोकणी, मल्याळम आदी भाषांमध्ये भाविकांसाठी ऑनलाईन मिसा (विशेष प्रार्थना) घेतली जात आहे. ३ फेब्रुवारीपासून दररोज एक फादर मिसा देत आहे. कोरोनाचे संकट समूळ नष्ट व्हावे, अखिल विश्वाला सुख, शांती, समृद्धी लाभावी अशी प्रार्थना यावेळी करण्यात येत आहे. बाळ येशू मंदिर यात्रा दरवर्षी फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात भरते. तथापि, कोरोनाचे संकट लक्षात घेऊन राज्य सरकारने नवीन नियमावली लागू केली आहे. त्यानुसार बाळ येशूची यात्रा या वर्षी ऑनलाईन भरविण्याचा निर्णय देवस्थानच्या बैठकीत घेण्यात आला. १३ फेब्रुवारीपर्यंत आणि शासनाचा पुढील आदेश येईपर्यंत बाळ येशू मंदिर व परिसरात भाविकांना प्रवेशास प्रतिबंध करण्यात आला आहे.
बाळ येशूकडे केलेला नवस पूर्ण होतो, अशी श्रद्धा असल्याने ही यात्रा देश-विदेशात प्रसिद्ध आहे. असंख्य भाविक देशभरातून येथे येतात. नवस बोलतात. यात्रेत पूजा वस्तू, खाद्यपदार्थ, खेळणी, फळ आदी विक्रीतून मोठी आर्थिक उलाढाल होते. यात्रा काळात वेगवेगळे फादर विविध भाषांमधून मिसा (विशेष प्रार्थना) देतात. त्याला भाविकांचा मोठा प्रतिसाद लाभतो. दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट कायम असल्याने फादर एरल फर्नांडिस यांनी देवस्थानाच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच बैठक घेतली. भाविकांची सुरक्षा लक्षात घेऊन यात्रा ऑनलाईन भरविण्याचा निर्णय घेण्यात आला. तसे फलक मंदिर परिसरात लावण्यात आले आहेत.