काटेरी मुकुट आणि अपेक्षाचे ओझे !
By श्याम बागुल | Published: February 6, 2019 06:16 PM2019-02-06T18:16:21+5:302019-02-06T18:18:36+5:30
जिल्हा कॉँग्रेस कमिटीत कधी नव्हे कार्यकर्त्यांच्या खच्चून गर्दीने पार पडलेल्या या सोहळ्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली असली तरी, ज्यांनी मालेगावी शेवाळे यांच्या नियुक्तीबद्दल जाहीर अभिनंदन करणारे फलक जागोजागी लावले ते प्रसाद हिरे व त्यांचेच समर्थक म्हणून मानले जात असलेले
श्याम बागुल
नाशिक : अपेक्षेबरहुकूम अखेर जिल्हा कॉँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची सूत्रे डॉ. तुषार शेवाळे यांनी स्वीकारून या संदर्भात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या चर्चेला विराम दिला असला तरी, असा विराम देताना थेट अखिल भारतीय कॉँग्रेसचे सरचिटणीस व उत्तर महाराष्टÑाचे प्रभारी वालसी चांदरेड्डी यांनाच पदग्रहण सोहळ्यास पाचारण केल्यामुळे शेवाळे यांच्या नियुक्ती विषयीची नाराजी व्यक्त करण्यास अधीर झालेल्यांची तोंडे आपसूकच बंद झाली, दुसरे म्हणजे चांदरेड्डी यांनीच शेवाळे यांची नियुक्ती राहुल गांधी यांच्या मान्यतेने झाल्याचा जाहीर खुलासा करून टाकल्यामुळे शेवाळे यांच्या पदावर डोळा ठेवून असलेल्यांचा भ्रमनिरास झाला. उलट शेवाळे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करताना प्रत्येक वक्त्याने त्यांना जिल्हाध्यक्षपदाच्या ‘काटेरी’ मुकुटाची जाणीव करून देत पक्ष रसातळाला गेल्याचे बोलही सुनावले, परंतु शेवाळे यांनी नुकताच कुठे पदभार स्वीकारला याचा विसर सोयीस्करपणे पाडून घेत, पक्ष रसातळाला नेण्यात त्यांचाही तितकाच हातभार होता, याचा उल्लेख करणे मात्र जाणीवपूर्वक टाळले.
जिल्हा कॉँग्रेस कमिटीत कधी नव्हे कार्यकर्त्यांच्या खच्चून गर्दीने पार पडलेल्या या सोहळ्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली असली तरी, ज्यांनी मालेगावी शेवाळे यांच्या नियुक्तीबद्दल जाहीर अभिनंदन करणारे फलक जागोजागी लावले ते प्रसाद हिरे व त्यांचेच समर्थक म्हणून मानले जात असलेले शांताराम लाठर या दोन्ही मालेगावच्या पदाधिका-यांची अनुपस्थिती बरेच काही सांगून गेली. तसेच या पदग्रहण सोहळ्याला जिल्ह्यातील अन्य तालुक्यांतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांपेक्षा मालेगाव, देवळा, बागलाण या तालुक्यांचीच असलेली सर्वाधिक हजेरी पाहता, शेवाळे जिल्हा कॉँग्रेसचे अध्यक्ष की कसमा पट्ट्याचे असा प्रश्नही पडल्याशिवाय राहिला नाही असो. असे असले तरी, जिल्हा कॉँग्रेसमध्ये गेल्या अठरा वर्षांपासून साचलेपण आल्याच्या केल्या जात असलेल्या तक्रारी व राजाराम पानगव्हाणे यांच्याविषयी पक्षश्रेष्ठींकडे केल्या जात असलेल्या कागाळ्या करण्याची संधी आता यापुढे संबंधिताना मिळणार नाही असे समजूनच काही वक्तव्यांनी या पदग्रहण सोहळ्यात जाता जाता पानगव्हाणे यांनी अठरा वर्षे जिल्हाध्यक्षपद कसे सांभाळले असेल याविषयी त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करतानाच याच काळात पक्ष मात्र अगदीच रसातळाला गेल्याचे पराभूत मानसिकतेचे दाखले दिले. त्यातून पानगव्हाणे यांचे कौतुक कमी तर त्यांच्या काळात स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत पक्षाच्या झालेल्या पराभवाचे खापरदेखील अप्रत्यक्ष फोडून टाकले. जिल्हाध्यक्षपदाचा मुकुट ‘काटेरी’ असल्याची जाणीव वेळोवेळी नवनियुक्त तुषार शेवाळे यांना प्रत्येक वक्तव्याने करून देण्यामागच्या कारणांचा उलगडा झाला नसला तरी, ज्यांनी ज्यांनी या सोहळ्याच्या निमित्ताने मार्गदर्शनाची संधी साधून घेतली त्यांनी मात्र अप्रत्यक्ष शेवाळे यांनी आपले ऐकूनच पुढचे राजकारण करावे असे सुचविले. मुळात शेवाळे हे गेली अनेक वर्षे कॉँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. स्व. बळीराम हिरे यांच्यापासून राजकारणाचे धडे घेतलेल्या शेवाळे यांनी वैद्यकीय क्षेत्र सांभाळतानाच सामाजिक उपक्रमांद्वारे जनसामान्यांशी आपली नाळ कायम ठेवली. राज्यातील दुसºया क्रमांकाच्या मविप्र शिक्षण संस्थेचे ते अध्यक्ष असताना मालेगाव तालुका कॉँग्रेसचे अध्यक्षपदही त्यांनी अडचणीच्या काळात पेलले त्यामुळे जिल्ह्यातील राजकारणाशी जसे ते परिचित आहेत, त्यापेक्षा जिल्हा कॉँग्रेसचे राजकारण त्यांच्या अंगळवणी पडले आहे. जिल्हाध्यक्षपदाचा मुकुट काटेरीच असतो, हे नवीन सांगण्याची त्यांना कोणाची गरज नसली तरी, आगामी काळात पक्षाला गतवैभव प्राप्त करून देण्याची जबाबदारी एकट्या तुषार शेवाळे यांच्याकडून बाळगण्याची अपेक्षा ठेवणाºयांनी मात्र आपण पक्षासाठी काय योगदान देणार याविषयी सोयीस्कर मौन पाळले.