नाशिक : मोहाडी-साकोरेजवळील एचएएलच्या संरक्षक भींतीच्या भगदाडात अडकून कुंपणाच्या तारांच्या विळख्याने जबर जखमी झालेल्या मादीने अखेर उपचारादरम्यान उपचाराला साथ न देता आपले प्राण सोडले. तसेच सिन्नर वनपरिक्षेत्रांतर्गत बेशुद्धावस्थेत आढळून आलेल्या बिबट्याचा (मादी) रक्तात संसर्ग झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला. गेल्या आठवड्यात दोन बिबटे अशाप्रकारे अकस्मात मृत्यमुखी पडले.
भक्ष्याच्या शोधात भटकंती करताना जंगलात धावण्याचा प्रयत्नात बिबट्या भगदाडातून निसटून टोकदार तारांच्या कुंपणात अडकून पडल्याची घटना मागील आठवड्यात घडली होती.धारदार तारांचा फास शरिराभोवती आवळला गेल्याने बिबट्या स्वत:ची सुटका करु शकला नव्हता. पूर्व वनविभागाच्या रेस्क्यू पथकाने घटनास्थळी धाव घेत यशस्वीरीत्या बिबट्याला रेस्क्यू केले. तातडीने उपचारासाठी चांदवडला हलविण्यात आले; मात्र उपचार सुरु असताना या अवघ्या ७ ते ८ महिन्यांच्या मादीने अचानकपणे उपचारास प्रतिसाद देणे थांबवत प्राण सोडल्याची माहिती वनविभागाचे सहायक वनसंरक्षक डॉ. सुजीत नेवसे यांनी दिली. २०१८ साली नोव्हेंबर महिन्यात अशाचप्रकारे एक बिबट्या येथील भिंतीच्या भगदाडातून बाहेर पडताना कुंपणात अडकून गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडला होता.
रक्तात संसर्ग पसरल्याने बिबट्या गतप्राणसिन्नर तालुक्यातील एका गावाच्या शिवारात शनिवारी (दि.२७) बिबट्याची मादी बेशुद्धावस्थेत आढळून आली होती. सिन्नर वनपरिक्षेत्राच्या अधिकारी मनिषा जाधव व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत बिबट्याला रेस्क्यू केले. त्यास नाशिकच्या पशुंच्या दवाखान्यात दाखल केले गेले. येथे पशुवैद्यकांनी बिबट्यावर उपचार सुरु केले. मात्र अवघ्या दोन दिवसांत बिबट्याने उपचारादरम्यान प्राण सोडले.