योगेश सगर।लोकमत न्यूज नेटवर्ककसबे सुकेणे : कोणी म्हणे बेदाणा करा.. कोणी म्हणे दहा रुपये किलोने व्यापाºयाला द्या.. अनेकांनी तर द्राक्षबाग तोडायचे सल्ले दिले.. द्राक्षांचे करायचे काय? तीन लाख रुपये कर्ज कसे फेडायचे ? त्यादिवशी रात्रभर झोप नाही.. असा विचार करताना एक कल्पना सुचली. इतर शेतकऱ्यांच्या मदतीने आपणच आपली द्राक्षे विकली तर ? आणि सकाळी उठलो.. इतरांनाही कल्पना पटली.. आणि मजूर, व्यापारी, हातविक्री, किरकोळ व्यावसायिकांच्या भूमिकेत थेट नाशिक गाठले. गल्लोगल्ली जाऊन ‘नाशिकची गोड.. द्राक्ष.. घ्या.. शेतकºयाला मदत करा..’ असं म्हणत म्हणत आमची दोन तासात तब्बल दहा क्विंंटल द्राक्ष हातोहात संपली...देवपूरचे संतोष शिरसाठ, दात्याणेचे गोरख गुरगुडे, पिंंपळगावचे केशव बनकर आणि उंबरखेडचे विकास आथरे या तरुण शेतकºयांनी कोरोनाच्या लॉकडाउन काळात आलेल्या संकटावर मात करण्याचा असा उपाय शोधला. निफाड तालुक्यातील चार शेतकºयांनी कोरोनामुळे ओढवलेल्या संकटाचा धीराने सामना करत विक्रीच्या कडू-आंबट संघर्षात चांगली कमाई केली. या चार शेतकºयांनी स्वत:च मजूर, व्यापारी बनत आपल्या बागेतील द्राक्ष पॅकिंंग करून महाराष्ट्रातल्या विविध बाजारपेठांमध्ये विक्री सुरू केली आहे.कोणत्याही परिस्थितीत हार न मानता दारोदारी जाऊन घरपोहोच द्राक्ष विक्री सुरू केली आहे आणि किरकोळ व्यापारातून दोन पैसेही हातात पडू लागले. याकामी त्यांना जिल्हा प्रशासनानेही सहकार्य केले. कोरोनाच्या मंदीमधून संधी शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. यापुढेही आपण याच व्यवस्थेत काम करून उत्पादक ते ग्राहक ही थेट वितरणव्यवस्था निर्माण करून ग्राहकाला दर्जेदार माल देत मधल्या दलालांच्या साखळीतून ही वितरणप्रणाली मुक्त करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, असे हे तरुण शेतकरी सांगतात.
‘त्या’ शेतकऱ्यांनी घरोघरी जाऊन विकली द्राक्षे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 8:38 PM