लोकमत न्यूज नेटवर्क
सिन्नर : शहर व तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. तथापि, संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुले जास्त प्रमाणात बाधित होण्याचा अंदाज व्यक्त केला जात असताना सिन्नरच्या इंडियाबुल्स कोविड रुग्णालयातून अडीच आणि चारवर्षीय बालिकांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. बालकांच्या या कोरोनाविरोधातील सकारात्मक लढ्यामुळे पालक आणि आरोग्य कर्मचारी भावुक झाल्याचे चित्र दिसून आले. तिसऱ्या लाटेत लहान बालके बाधित होण्याची भीती व्यक्त केली जात असताना सिन्नर तालुक्यात दोन बालकांनी कोरोनासोबत दोन हात करून त्याला चितपट केल्याने आरोग्य यंत्रणेसह प्रशासनाचा आत्मविश्वास वाढला आहे.
सिन्नरजवळील मुसळगाव येथील इंडियाबुल्स कोविड सेंटरमध्ये २१ मे रोजी तालुक्यातील घोटेवाडी येथील चारवर्षीय बालिका कोरोनाच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाली होती. या बालिकेवर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, सिन्नर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. वर्षा लहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली इंडियाबुल्स कोविड रुग्णालयाच्या अधिकारी डॉ. अनिता सोनवणे, समुदाय आरोग्य अधिकारी शुभांगी शिंदे यांच्यासह सर्वच आरोग्य कर्मचाऱ्यांनी योग्य काळजी घेत औषधोपचार केले. पालकांचीही भूमिका सकारात्मक राहिली. त्यामुळे या बालिकेने कोरोनावर मात केली. तिला मंगळवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
----
आरोग्य कर्मचारी भावुक
घोटेवाडी येथील अडीचवर्षीय चिमुरडीला १९ मे रोजी कोरोनाची बाधा झाला होती. तिलाही इंडियाबुल्स कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या अडीच वर्षाच्या बालिकेचा सांभाळ करणे पालकांसाठी कठीण गोष्ट होती. मात्र पालकांसह आरोग्य कर्मचाऱ्यांनी योग्य काळजी घेऊन कोरोनाला हरवले. अडीच वर्षीय चिमुरडीने बुधवारी (दि. २६) कोरोनावर मात केली. या अडीच वर्षीय बालिकेला रुग्णालयात डिस्चार्ज देताना आरोग्य कर्मचारी भावुक झाले होते तर पालकांनाही गहिवरून आले होते.
----------------
संभाव्य तिसऱ्या लाटेत बालके बाधित होणार असल्याचे सांगितले जात असले तरी घाबरण्याचे कारण नाही. बालकांना लक्षणे दिसल्यानंतर ताबडतोब कोविडची तपासणी करून घ्यावी. या आठवड्यात चार व अडीच वर्षीय बालिकांना कोरोनावर यशस्वी मात केल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. घाबरण्याचे कारण नसले तरी पालकांनी येणाऱ्या काळात बालकांची काळजी घ्यावी.
- डॉ.मोहन बच्छाव, तालुका आरोग्य अधिकारी, सिन्नर
---------------------
सिन्नरच्या इंडियाबुल्स कोविड सेंटरमधून अडीच वर्षाच्या बालिकेला आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून डिस्चार्ज दिला. (२६ सिन्नर ४)
===Photopath===
260521\26nsk_48_26052021_13.jpg
===Caption===
२६ सिन्नर ४