नाशिक : तळेगाव येथील अल्पवयीन मुलगी अत्याचार प्रकरणानंतर ग्रामीण भागातील अतिसंवेदनशील सहा गावांमध्ये कायमस्वरूपी पोलीस चौकी कार्यान्वित केली जाणार असल्याची माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे यांनी दिली आहे़ येत्या आठवड्यात या पोलीस चौकींवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून त्या कार्यान्वित केल्या जाणार आहेत़ त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली होती़ या घटनेचे तीव्र पडसाद दुसऱ्या दिवशी संपूर्ण जिल्ह्यात उमटले होते़ सुमारे पाच ते सहा दिवस सुरू असलेल्या या तणावामुळे नाशिक, इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील विल्होळी, तळेगाव, अंजनेरी, तळवाडे, वाडीवऱ्हे, सांजेगाव, गोंदे व शेवगेडांग या ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली होती़ या गावांतील परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर संचारबंदी टप्प्याटप्प्याने उठविण्यात आली असली तरी जिल्ह्यात जमावबंदी तसेच या गावामधील पोलीस बंदोबस्त कायम आहे़ जिल्'ातील अतिसंवेदनशील असे तळेगाव, अंजनेरी, तळवाडे, विल्होळी, सांजेगाव व शेवगेडांग या सहा ठिकाणी कायमस्वरूपी पोलीस चौक्या उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़ या चौक्यावर पोलीस कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करून आठवडाभरात त्या कार्यान्वित केल्या जाणार आहेत़ दरम्यान, या गावांमध्ये कायदा व सुव्यवस्था तसेच जातीय सलोखा प्रस्थापित करण्यासाठी पोलीस व जिल्हा प्रशासनातर्फे शांतता समितीच्या माध्यमातून बैठका सुरू आहेत़ (प्रतिनिधी)
‘त्या’ सहा गावांमध्ये कायमस्वरूपी पोलीस चौकी
By admin | Published: October 18, 2016 10:44 PM