नाशिक : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर एक हजार रुपये दंडाची कारवाई सुरू करण्यात आली होती. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात दंड भरण्यास नागरिक असमर्थता व्यक्त करीत असल्याने अखेरीस आयुक्तांनी दंडाच्या रकमेत घट केली असून पुन्हा दोनशे रुपये दंड आकारणीचे सुधारित आदेश रविवारी (दि १४) दिले आहे. त्याचप्रमाणे मास्क न लावणाऱ्यांवर कारवाई करण्यास कुचराई केली तर स्वच्छता निरीक्षकांवरही कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
नाशिकमध्ये गेल्या वर्षी कोरोना संसर्गाने कहर केला होता. ऑक्टोबर महिन्यापर्यंत रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. नोव्हेंबरमध्ये मात्र रुग्ण संख्या कमी होऊ लागली. परंतु जानेवारी महिन्यात आरोग्य नियमांचे पालन न करणाऱ्यांची संख्या वाढली. त्यामुळे २२ जानेवारी रोजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत यासंदर्भात चर्चा करण्यात आली आणि आरोग्य नियमांचे पालन न करणाऱ्या विशेषता मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर वचक बसवण्यासाठी दोनशेऐवजी एक हजार रुपये दंड करावा, असा निर्णय घेण्यात आल्याने महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी साथ प्रतिबंधक कायद्याच्या आधारे मास्क न वापरणाऱ्या आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या नागरिकांवर एक हजार रुपये रुपयांची दंडात्मक कारवाई करावी, असे आदेश दिले होते. त्यानुसार कारवाई देखील सुरू झाली होती, परंतु, महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत हा दंड मोठ्या रकमेचा असून नागरिकांना अडचणीत टाकणारा आहे, अशी चर्चा झाली. त्यावेळी आयुक्तांनी दंडाची रक्कम कमी करण्यास नकार दिला होता. मात्र आता आयुक्तांनी सुधारित आदेश जारी केले असून मास्क न वापरणाऱ्या नागरिकांना पूर्वीप्रमाणेच दोनशे रुपयांचा दंड करण्यात येणार आहे. मनपा आयुक्तांनी रविवारी ( दि .१४) जारी केलेल्या आदेशात या संदर्भात उल्लेख केला असून एक हजार रुपये दंड जमा करण्यात नागरिकांना अडचणी येत आहेत. त्याचप्रमाणे दंड वसूल करणे आणि त्या माध्यमातून उत्पन्न वाढवणे हा महापालिकेचा उद्देश नाही, तर मास्कचा वापर करण्यास सक्ती करणे हा उद्देश असल्यामुळे आदेशात सुधारणा करण्यात आल्याचे नमूद केले आहे. दरम्यान, महापालिकेचे विभागीय अधिकारी आरोग्य अधिकारी स्वच्छता निरीक्षक तसेच पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि तलाठी यांना देखील दंडात्मक कारवाईचे आदेश अधिकार देण्यात आले आहेत.
पोलीस दलाकडून आकारण्यात येणाऱ्या दंडाची रक्कम महापालिकेच्या खजिन्यात जमा झाली असली तरी त्यातील ५० टक्के रक्कम ही पोलीस कल्याण निधीला देण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी नमूद केले आहेत.
इन्फो
स्वच्छता निरीक्षकांवर कारवाईचा इशारा
मास्क न वापरणाऱ्यावर अपेक्षेप्रमाणे कारवाई होत नसल्याने घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या संचालक डॉ. कल्पना कुटे यांनी स्वच्छता निरीक्षकांना कारवाईचे आदेश दिले आहेत. कारवाई कमी झाल्यामुळे आयुक्त कैलास जाधव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे स्वच्छता निरीक्षक यांनी कारवाई करावी, या संदर्भातील कारवाईत कसूर केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा देखील डॉ. कल्पना कुटे यांनी दिला आहे.