नाशिक : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ओबीसींना आरक्षण देण्यात राज्य सरकार कमी पडले नाही, मात्र सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींच्या जागांना स्थगिती दिली आहे. राज्य निवडणूक आयोगाला निवडणूक थांबवण्याची विनंती करून सगळ्या निवडणूक एकत्र घ्याव्यात असा आमचा आग्रह आहे. परंतु तरीही निवडणूक होत असेल तर सामोरे जावे लागेल. मात्र आगामी काळातील महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सरकार म्हणून काही तरी भूमिका घ्यावी लागेल असे सूतोवाच राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.नाशिक जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभांना उपस्थित राहण्यासाठी बाळासाहेब थोरात दौऱ्यावर आले असता त्यांनी शुक्रवारी (दि.१७) माध्यमांशी संपर्क साधला. राज्यातील परीक्षा घोटाळ्यातील दोषींवर कारवाई केली जाईल. मात्र परीक्षा घेणाऱ्या संस्था या पूर्वीच्या सरकारने नेमल्या असून, ज्या संस्था परीक्षा घेतात आमचा त्यावरच आक्षेप आहे, त्या संस्था बदलल्या पाहिजे उच्च दर्जाच्या संस्था निवडल्या पाहिजे असेही थोरात म्हणाले. महाविकास आघाडी सरकारकडून काँग्रेसला अपुरा निधी दिला जात असल्याच्या तक्रारीबाबत थोरात यांनी निधी वाटपात कोणतीही असमानता नाही, विभागानुसार निधी वाटप केला जातो, त्यामुळे काँग्रेसच्या सदस्यांनाही निधी मिळत असल्याचे सांगितले. काँग्रेस आहे म्हणून महाविकास आघाडी सरकार आहे या अशोक चव्हाण यांच्या वक्तव्यावर ते काहीच चुकीचे बोलले नाहीत, राज्यात तीन पक्षाचे सरकार आहे व त्यात काँग्रेसचे महत्व असल्याचे ते म्हणाले.
बांगलादेश मुक्तीच्या कार्यक्रमात इंदिरा गांधीचे नाव टाळण्यात आले, पण प्रत्येकाच्या मनात इंदिरा गांधीचे नाव होते. अटलजींचे मोठे मन होते, आता दुर्दैवाने तसे दिसत नाही असा टोलाही थोरात यांनी भाजपला लगावला. चंद्रकांत पाटील यांना रात्री स्वप्न पडतात आणि सकाळी ते बोलत असतात, त्यामुळे सत्तेत येण्याचे स्वप्न पडत असतात असे सांगून थोरात यांनी चंद्रकांत पाटील यांनी काही गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे, शिवाजी महाराज साऱ्यांचेच श्रद्धास्थान आहेत, त्यांना मर्यादित करू नये, ते व्यापक होते, रयतेचे राजे होते असा सल्लाही दिला आहे.