सिन्नर : वक्ता हा समाज घडविण्याचे काम पूर्वीपासून करत आहे. पूर्वी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ आदी सर्वच संतांनी आपल्या वक्तृत्वातून समाजप्रबोधन केले. हे समाजप्रबोधन करण्यासाठी त्यांनी सत्विचारांना स्थान दिले, असे प्रतिपादन सिन्नर महाविद्यालयात प्राध्यापक प्रबोधनी व्याख्यानमाला उद्घाटनप्रसंगी डॉ. माधव खालकर यांनी केले.
प्राचार्य डाॅ. पी. व्ही. रसाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास उपप्राचार्य आर. व्ही. पवार, डॉ. डी. एम. जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली.
कार्यक्रमाचे पहिले पुष्प गुंफताना डॉ. खालकर पुढे म्हणाले की, प्राचीन काळापासून विविध पारंपरिक माध्यमांनी समाजप्रबोधनाचे कार्य केले आहे. त्यात कीर्तन, भजन, अभंग, तमाशा आदी लोककलांची भूमिका महत्त्वाची आहे. अशाच प्रकारचे कार्य शाहीर परशराम यांनी देखील ''तमाशा'' या साधनांच्या माध्यमातून केले. विपरित परिस्थितीत त्यांनी समाजविकासाचे कार्य हाती घेतले. समाजाचे मानसिक बळ वाढविण्याचे कार्य त्यांनी आपल्या लोककलेतून केले. त्याचप्रमाणे संतांनी देखील आपल्या वक्तृत्वातून सर्व विचारांची पेरणी केली. म्हणूनच मनुष्याने या चांगल्या हेतूने कार्य केल्यास त्याचे फळ निश्चितच मिळते. प्रत्येकाने स्वविकास साधताना आणि स्वतःला घडविताना संतांची शिकवण अंगिकारल्यास निश्चितच सर्वांचा विकास होईल. यासाठी आपल्या विचारांची उंची राखून वर्तन करावे. संत तुकाराम महाराजांनी अभंगांचे धन समाजाला दिले. ते सर्वांनी लुटावे, म्हणजेच अशा विचारांचा लाभ सर्वांना होईल. जगाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन विकसित केल्यास द्वेष, मत्सर राहणार नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. व्ही. रसाळ यांनी, प्राध्यापक प्रबोधिनी व्याख्यानमालेतून विविध विषयांचे ज्ञान सर्वांना मिळते. त्यामुळे वैचारिक प्रगल्भता वाढण्यास मदत होईल. त्याचबरोबर एक चांगले व्यासपीठ व्याख्यानमालेद्वारे प्राप्त होत असल्याचे स्पष्ट केले.
सूत्रसंचालन व पाहुण्यांचा परिचय जयश्री बागुल यांनी करून दिला. आभार प्राध्यापक डाॅ. द. ल. फलके यांनी मानले.
-------------------
सिन्नर महाविद्यालयात प्राध्यापक प्रबोधिनी व्याख्यानमालेत बोलताना डॉ. माधव खालकर. (१३ खालकर)
130721\13nsk_8_13072021_13.jpg
१३ खालकर