चांदवड : शहरात विजयादशमी सण उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोनाचे सावट असले तरी चांदवड येथील कुलस्वामिनी श्री रेणुका देवी मातेच्या मंदिरात हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. दरवर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी भाविकांनी दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती. सकाळपासून दूरवर दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या.
दसऱ्यानिमित्त झेंडूच्या फुलांनी बाजारपेठ फुलली होती तर झेंडूचे भाव प्रारंभी वधारल्याने नागरिकांनी खरेदी करण्यास हात आखडता घेतला. नंतर झेंडू मातीमोल भावाने विकला गेला. दरम्यान, रेणुका माता मंदिरात भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. गर्दीमुळे संस्थान व पोलीस प्रशासनावर मोठा ताण पडला. पूर्वापार चालत असलेल्या प्रथेनुसार श्री रेणुका देवी मातेच्या पालखीची सवाद्य मिरवणूक काढण्यात येते तर पालखीत श्री रेणुका मातेची प्रतिमा, सुवर्ण अलंकार, अहिल्यादेवींची प्रतिमा असते. या पालखीस मोठा पोलीस बंदोबस्त असतो. सदरची पालखी रेणुका मंदिरातून पुरातन मनमाड-लासलगाव चौफुलीवरील श्री खंडेराव महाराज मंदिरात नेण्यात येते मात्र यंदा पालखी मिरवणूक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संस्थानने रद्द केली. यावेळी पालखी ऐवजी श्री. रेणुका देवीचा मुखवटा वाहनातून नेऊन परंपरेनुसार खंडेराव महाराज मंदिरात जाऊन देवी व खंडेराव महाराज यांची भेट घडवून आणल्याची माहिती सहायक व्यवस्थापक सुभाष पवार यांनी दिली. यावेळी खंडेराव महाराज मंदिरातही दर्शनासाठी अनेकांनी गर्दी केली होती. या मंदिरातही पुरोहित अरूण दीक्षित यांनी आपट्याची झाडे व पूजा साहित्य मांडले होते. मंत्रोचारात अनेक भाविकांनी सीमोल्लंघन केले.
इन्फो
अन्य मंदिरांमध्ये ही कार्यक्रम
दररोज श्री रेणुका देवी मंदिराचा गाभारा विविध फुलांनी सजावटीचे काम बाळासाहेब होनराव यांनी केले. संस्थानच्या वतीने पोलीस, गृहरक्षक,स्वयंसेवक व भाविकांना दररोज महाप्रसाद (भोजन) देण्यात आला. तर गर्दीवर विशेष नियंत्रण करण्यासाठी गृहरक्षक दलाच्या जवानांनी विशेष परिश्रम घेतले. दरम्यान अनेकांनी घरोघरी जाऊन सोने-नाणे वाटप करून दसऱ्याचा आनंद द्विगुणित केला तर येथील म्हसोबा चौकीवरील सप्तशृंगी देवी मंदिरात तसेच म्हसोबा मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते . कोबंडवाडी येथील भैरवनाथ मंदिरातही भाविक दहा दिवस घटी बसले होते.