नाशिक : नवरात्रोत्सवानिमित्त मागील बुधवारपासून जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील कालिका देवी मंदिराच्या आवारात यात्रोत्सव सुरू आहे. या आठवडाभरात कालिकामातेच्या चरणी हजारो भाविक लीन झाले. यावर्षी ‘पेड दर्शन’ची सुविधा जरी उपलब्ध करून देण्यात आली असली तरी भाविकांचा फारसा प्रतिसाद लाभला नाही. रांगेत उभे राहून कालिक ामातेचा जयघोष करीत दर्शनाचा लाभ घेण्याचा वेगळाच आनंद लाभतो, अशा भावना भाविकांनी व्यक्त केल्या. कालिका देवीच्या यात्रेचे नाशिककरांना दरवर्षी आकर्षण असते. यावर्षी यात्रोत्सवात विक्रेते कमी संख्येने दाखल झाले असले तरी भाविकांच्या गर्दीवर त्याचा कुठलाही परिणाम झालेला जाणवला नाही. यात्रेचे अखेरचे दोन दिवस शिल्लक राहिल्यामुळे मंगळवारी भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. यावर्षीदेखील मंदिराकडून यात्रोत्सवात आलेल्या भाविकांचा सुमारे दोन कोटी रुपयांचा विमा उतरविण्यात आला आहे. गर्दीचा अंदाज लक्षात घेत पोलीस प्रशासनाकडून बंदोबस्त वाढविण्यात आला होता तरीदेखील गर्दीवर नियंत्रण मिळविताना पोलिसांची दमछाक झाली. मात्र कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.कालिका देवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत आहेत. पहाटे काकड आरती, सकाळी महापूजा, संध्याकाळी आरती असे धार्मिक कार्यक्रमांना नागरिकांची गर्दी होत आहे. मंगळवारी सप्तमीला मंदिरात होमहवन व पूजाविधी करण्यात आले.
कालिकेच्या चरणी हजारो भाविक नतमस्तक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 01:06 IST