जुने नाशिक : मुहर्रम महिन्याच्या ९ व १० तारखेला भरणाऱ्या सारडा सर्क ल येथील हजरत सय्यद इमामशहा बाबा यांच्या दर्ग्यावर भाविकांनी ‘आशुरा’च्या पूर्वसंध्येला दर्शनासाठी गर्दी केली होती. येथील शेकडो वर्षांच्या परंपरेनुसार मुस्लीम-हिंदू बांधवांनी तयार केलेल्या अळीवच्या हिरवळीचा मानाचा ताबूत भाविकांच्या दर्शनासाठी खुला करण्यात आला आहे. परंपरेनुसार मंगळवारी (दि. ४) दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास जुन्या नाशकातून ताबूतांची मिरवणूक काढण्यात येणार आहे.इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांचे नातू शहीद-ए-आझम हजरत इमामे हुसेन व त्यांचे कुटुंबीय सत्य व मानवतावादी तत्त्वांच्या संरक्षणार्थ मुहर्रम महिन्यात करबलाच्या मैदानावर झालेल्या युद्धात शहीद झाले. त्यामुळे मुस्लीम बांधवांच्या वतीने शहरात मुहर्रमचे पहिले दहा दिवस विविध ठिकाणी प्रवचनमालांचे आयोजन करून शहिदांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. दरम्यान, जुन्या नाशकातील बागवानपुरा, कोकणीपुरा, नाईकवाडीपुरा, भक्तिनगर, वडाळागावातील तैबानगर, रझा चौक चिश्तीया कॉलनी आदि ठिकाणी प्रवचनमालांना रात्री समाजबांधवांची गर्दी लोटली होती. तसेच विविध मशिदींमध्येदेखील सामूहिकरीत्या कुराणपठण करण्यात आले. नागरिक ांनी आशुराच्या पूर्वसंध्येला घरांमध्ये ‘खिचडा’ हे विशेष खाद्यपदार्थ व सरबत तयार करून फातिहापठण करण्यात आले. (प्रतिनिधी)