नाशिक : भारतीय जैन संघटनेने कोरोनाचे रुग्ण देशात सापडू लागल्यापासून तत्काळ म्हणजे २६ मार्च २०२० पासूनच संपूर्ण राज्यासह नाशकात कार्यास प्रारंभ केला. संघटनेच्या वतीने कोरोना काळात केलेले सर्वात मोठे योगदान म्हणून ‘मिशन झीरो’ या मालेगावसारखे शहर कोरोनापासून मुक्त करण्यातील योगदानाचा उल्लेख करावा लागेल. त्याशिवाय अन्य अनेक संघटनांनी धान्य वितरण, अन्न वाटप, रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी पुढाकार, अर्सेनिक अल्बम औषधांचे वितरण, मास्क वितरण, सॅनिटायझरचे वाटप असे विविध उपक्रम राबवत समाजासाठी मोलाचे योगदान देण्यात आले.
संस्थापक शांतीलाल मुथ्था यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकमध्ये बीजेएसच्या सर्वाधिक समाजोपयोगी ठरलेल्या कार्याची धुरा समन्वयक म्हणून नंदकिशोर साखला यांनी सांभाळली. संघटनेच्या वतीने महाराष्ट्रातील प्रत्येक महानगराप्रमाणे नाशिकमध्येदेखील दोन लाख फुड पॅकेट्सचे वितरण, नाशिकला १८ मोबाइल डिस्पेन्सरी व्हॅनव्दारे ‘डॉक्टर आपल्या दारी’अंतर्गत वैद्यकीय सेवा तसेच एकूण ६८ हजार २७९ संशयित रुग्ण शासकीय रुग्णालयांकडे रेफर करण्यात आले. महानगरातील ३ लाख ९४ हजार ८९६ रुग्णांचे ट्रेसिंग, ३६ अँटिजेन डिस्पेन्सरीचा वापर, ११ हजार ४६६ आरटीपीसीआर सॅम्पल्सचे रुग्ण बाधित आढळल्याने शासकीय रुग्णालयांकडे रेफर करण्यात आले. किराणा सामानाच्या लाखो किटचे वितरण, राज्यातील सर्व विभागातील पोलिसांना मास्क, सॅनिटायझरचे वितरण, हजारो रक्त पिशव्यांचे संकलन, कामगार शेल्टर कॅम्पमध्ये सकाळ, सायंकाळी जेवण व्यवस्था, मिशन झीरो अंतर्गत शंभरहून अधिक मोबाइल डिस्पेन्सरी व्हॅन्सच्या माध्यमातून राज्यभरात जनजागृती, तापमान मोजणी, प्राणवायू चाचण्या, प्लाझ्मा संकलन, ॲन्टीबॉडी तपासणीचे उपक्रम भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यात राबवले गेले. त्याशिवाय अशाच विविध उपक्रमांमध्ये वेलकम सहकार्य मित्रमंडळ, श्री गुरुव्दारा गुरुनानक दरबार, गुरुव्दारा देवळाली, राॅबिनहुड आर्मी, अमिगो लॉजिस्टिक्स इंडिया, दिनीयत संस्था, वुई फाउंडेशन, श्रीजी प्रसाद, झेप, नयनतारा ग्रुप, गाडगेबाबा निवारा, इंद्रकुंड निवारा, गुरुव्दारा नारायण धाम, तपोवन मित्र मंडळ, श्वास फाउंडेशन, इस्कॉन, दाऊदी बोहरा समाज, श्री स्वामी समर्थ मंदिर, सृजन नागरी मंच, तुलसी आय हॉस्पिटल, माऊली द फुड हब, लोकमान्य बहुद्देशीय संस्था, अग्रवाल सभा, हॅप्पी हेल्पिंग हँड, आराधना केंद्र, कुष्ठरोग मिशन, जय आनंद यासह अनेक सामाजिक संस्था आणि कंपन्यांनी सामाजिक उपक्रमांसाठी पुढाकार घेत समाजाला कोरोनाच्या संकटातून बाहेर येण्यासाठी आपापल्या परीने योगदान दिले.
----
संग्रहित छायाचित्र वापरावे...