कळवण : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या चार गट आणि पंचायत समितीच्या आठ गणांसाठी मंगळवार, दि. २१ रोजी मतदान घेण्यात येत आहे. तालुक्याच्या एक लाख १७ हजार ९८७ मतदार १५५ मतदान केंद्रांद्वारे मतदानाचा हक्क बजावणार आहे. निवडणुकीच तयारी पूर्ण झाली असून, प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. तालुक्यातील नऊ मतदान केंद्र अतिसंवेदनशील म्हणून पोलीस विभागाने घोषित केले असून, या केंद्रांवर पोलिसांचे विशेष लक्ष असणार आहे. सोमवारी सकाळी ८ वाजता निवडणूक कर्मचाऱ्यांना मध्यवर्ती प्रशासकीय इमारत आवारात बोलाविण्यात येऊन कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा मॉकपोलचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. त्यानंतर कर्मचाऱ्यांना बसेस व खासगी वाहनांतून नियुक्तीच्या ठिकाणी रवाना करण्यात आले. कळवण पंचायत समिती व नाशिक जिल्हा परिषद पंचवार्षिक निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या गटांतून चार जागांसाठी १६, तर पंचायत समिती गणाच्या आठ जागांसाठी ४२ असे एकूण ५८ उमेदवार निवडणूक लढवित आहे. जिल्हा परिेषद गटासाठी शुभ्र मतपत्रिका, तर पंचायत समिती गणासाठी गुलाबी मतपत्रिका असलेली मतदानयंत्रे अशी स्वतंत्र यंत्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. या मशीन्समध्ये ‘नोटा’चा पर्यायदेखील उपलब्ध असणार आहे. कळवण तालुक्यातील एक लाख १७ हजार ९८७ मतदार मंगळवारी आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. सकाळी साडेसात ते साडेपाच वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. दोन क्षेत्रीय अधिकारी, सोळा मतदान केंद्राध्यक्ष, सोळा मतदान अधिकारी, एक तसेच सोळा मतदान अधिकारी दोन व सोळा मतदान अधिकारी तीन, तेरा मतदान अधिकारी चार व सोळा राखीव शिपाई असे एकूण १०१८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान होणार आहे. मतदानप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतदान अधिकारी मतदानयंत्रांसह इतर साहित्य मध्यवर्ती प्रशासकीय इमारत कोल्हापूर फाटा येथे जमा करणार आहेत. या निवडणूक प्रक्रियेची मतमोजणी गुरुवार, दि. २३ रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयातील हॉल क्रमांक २ मध्ये येथे करण्यात येणार आहे. मतमोजणीसाठी सशस्त्र पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतदानप्रक्रियेसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांना टपाली मतपत्रिका यापूर्वीच वितरित करण्यात आल्या आहेत. या निवडणुकीसाठी कळवण तालुक्याची संपूर्ण प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणा सज्ज आहे. जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन निवडणूक अधिकारी गंगाथरण डी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अनिल गवांदे कैलास चावडे यांनी केले आहे. निर्भय वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांसह नेमणुका करण्यात आल्या आहेत. मतदान कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वाढीव पोलीस कुमक मागविण्यात आली आहे. निवडणूकप्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी पोलीस उपअधीक्षक देवीदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुजय घाटगे, विनोद जाधोर यांच्यासह पोलीस कर्मचारी परिश्रम घेत आहेत. (वार्ताहर)
कळवण तालुक्यात हजार कर्मचारी नियुक्त
By admin | Published: February 21, 2017 12:40 AM