नाशिक : आषाढी एकादशीला जे भाविक, सेवेकरी, वारकरी विठुरायाच्या भेटीला पंढरीत जाऊ शकले नाही अशा हजारो भाविकांनी दिंडोरी आणि त्र्यंबकेश्वर गुरुपीठात आषाढी एकादशी साजरी केली. दिंडोरी आणि त्र्यंबक मध्ये दोन लाखांपेक्षा अधिक भाविकांनी उपस्थिती नोंदवून श्री स्वामी समर्थ आणि गुरूमाउलींच्या दर्शनाचा आणि आशीर्वादाचा लाभ घेतला.
या प्रसंगी चंद्रकांत मोरे उपस्थित होते. दिवसभर सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा भाविकांच्या उत्साहावर कुठलाही परिणाम झाला नाही. रविवारी सेवेकऱ्यांनी त्र्यंबक नगरीत स्वच्छता अभियान राबवले.
श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या अभिनव उपक्रमाची अधिकृत घोषणा करण्यात आली.
श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या बालसंस्कार विभागाच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहेत. आता १ कोटी वृक्षलागवडीचा संकल्प करण्यात आला आहे. आजपासून ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत भारतातील सेवा केंद्र व बालसंस्कार विभागातील मुले, पालक व सेवेकरी हे १ कोटी वृक्षांची लागवड करुन त्यांचे संगोपन करणार आहेत. वनविभाग तसेच शासकीय रोपवाटिका यातून यासाठी रोपे अत्यंत अल्पदरात उपलब्ध आहेत. यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे नितीन मोरे यांनी केले आहे.
येत्या १३ तारखेला सेवामार्गाचा मुख्य गुरुपौर्णिमा उत्सव सर्व जगभरातील समर्थ केंद्रावर साजरा केला जाणार असून याची तयारी सर्व केंद्रावर सुरु आहे.