सिन्नर : तालुक्यातील पाटोळे येथे पानी फाउंडेशन आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले होते. यात एक हजारहून लोकांनी उत्साहाने सहभागी होऊन एकाच दिवसात बांध बंदिस्तीचे सुमारे दीड हजार घनमीटर लांबीचे काम केले.सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेसाठी पानी फाउंडेशनच्यावतीने तालुक्यात गेल्या वर्षापासून श्रमदानातून मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहे. प्रत्येक भागातील खेड्याची पाण्याची पातळी वाढवून पाणीदार महाराष्टÑ घडविण्यासाठी जो उपक्रम राज्यभर घेतला जात आहे तो सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धा २०१९ साठी तालुक्यातील अनेक गावे सहभागी झाले आहेत. धोंडबार, वडझिरे, औंढेवाडी यांसह पाटोळेत मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे सुरू आहेत.पाटोळे येथील ढवळा आंबा (चिपारी) परिसरात महाश्रमदान करण्यात आले. पानी फाउंडेशनचे जलमित्र आणि पाटोळे गावचे ग्रामस्थ यांच्या माध्यमातून आयोजित उपक्रमाला जवळपास १३०० हून अधिक पुरूष, महिलांसह तरूणांनी सहभाग नोंदविला. टिकाव, फावडे व घमेल्याच्या साथीने जणू पाणीदार महाराष्टÑासाठी त्यांनी शपथ घेतली.बांधबंधिस्ती, सलग समतर चर (सीसीटी), दोन दगडी बांध अशा विविध कामांचे उत्कृष्ट नियोजन केले होते. महाश्रमदान शिबिरासाठी पानी फाउंडेशन जलमित्र टिम, पाटोळे ग्रामस्थ, रामनगर, एस. बी. आय. कर्मचारी, आर्ट आॅफ लिव्हींगची टिम, सिन्नर महाविद्यालय राष्टÑीय सेवा योजना, माध्यमिक हायस्कूल, प्राथमिक शाळा, लोकनायक वाचनालय यासह गावातील विविध सेवाभावी संस्था आदींनी महाश्रमदानात सहभाग नोंदविला. महाश्रमदानात आर्ट आॅफ लिव्हींगचे राज्य समन्वयक विजय हाके, प्रशिक्षक संजय बडवर, निवृत्ती काकड, सिन्नर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. आर. व्ही. पवार, शिवसेना नेते उदय सांगळे, सरपंच मेघराज आव्हाड, आदी मान्यवरांनी उपस्थिती लावून श्रमदान केले. सदर उपक्रमात महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या.
महाश्रमदानासाठी सरसावले हजारो हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2019 6:02 PM