नाशिक : महापालिकेच्या पंचवटी विभागातील फुलेनगर येथील मेरी कार्यालयाजवळ असलेली भूमिगत जलवाहिनी सोमवारी (दि.१६) फुटल्याने हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे.मनपाच्या संबंधित ठेकेदाराच्या कामगारांनी जेसीबीसह या ठिकाणी हजेरी तर लावली; मात्र जलवाहिनी दुरुस्त न करता पाण्याचा कारंजा बंद व्हावा, यासाठी मातीचा भराव टाकून काढता पाय घेतला. यामुळे कारंजा बंद झाला असला तरी पाण्याचा अपव्यय मात्र अद्यापही सुरू असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. फुलेनगर झोपडपट्टीच्या अगदी जवळच जलवाहिनीला मोठी गळती लागल्यामुळे परिसरातील महिलांनी धुणी-भांडी तसेच रिक्षाचालकांनी रिक्षा व दुचाकी धुण्यासाठी गर्दी केली होती. बाळगोपाळांनी कारंजाचे तुषार अंगावर झेलत ओले चिंब होऊन नाचण्याचा आनंदही लुटला. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने याकडे काणाडोळा केल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.