नाशिक : रम्य सकाळ, गुलाबी थंडी, डिजेच्या तालात सुरू असलेले वार्मअप व हिरवा झेंडा मिळताच धाव घेणारे आबालवृद्ध अशा उत्साहपूर्ण वातावरणात आजची ‘नाशिक रन’ पार पडली़ यामध्ये सुमारे १५ हजार नाशिककरांनी धावत आपले आरोग्य सांभाळतानाच वंचितांना लाखो रुपयांचा मदतीचा हात दिला़ महात्मानगर मैदानावर आज सकाळी ८ वाजाता महापौर अशोक मुर्तडक व उपस्थितांच्या हस्ते हवेत फु गे सोडून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले़ तत्पर्वी घरकुल परिवाराची शिल्पा अशोक कुलकर्णी या विद्यार्थिनीच्या हस्ते ध्वजारोहण झाले़, तर आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत, अंजना ठमके, हिरामण थकील, श्रीमंत कोल्हे, अभिजित हिरकूड यांनी क्रीडा ज्योत कार्यक्रमस्थळी आणली़ कविता राऊत व अंजना ठमके यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करण्यात आली़ रनमध्ये सर्वप्रथम धावणाऱ्या शारीरिक व्यंग असणाऱ्या मुलांना महापौर अशोक मुर्तडक यांच्या हस्ते झेंडा दाखवून रनला सुरुवात झाली़ लहान मुलांसाठी तीन किलोमीटर, तर मोठ्या व्यक्तींसाठी ५ किलोमीटरचे अंतर होते़ हे अंतर पार करत पुन्हा सर्वजन महात्मानगर मैदानावर हजर झाले़ यानंतर या रनमध्ये सहभागी झालेल्यांसाठी लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अडीच लाख रुपयांच्या बक्षिसांचे वाटप करण्यात आले़ अखेरीस नाशिक रनच्या ध्वजाचे हस्तांतरण बॉशकडे करण्यात आले़ याप्रसंगी विक्रीकर विभागाचे सह आयुक्त सुमेरकुमार काले, सहायक पोलीस आयुक्त रवींद्र वाडेकर, नाशिक रनचे अध्यक्ष एच़ एस़ बॅनर्जी, उपाध्यक्ष एच़ बी़ थॉन्टेश, सदस्य उत्तम राठोड, आऱ के़ कासार, थॉमस मेरेबॅक्स, एस़ एस़ येवलेकर, मोहन पाटील, अनिल दैठनकर, उत्तरा खेर, अद्वैत खेर तसेच विविध कंपन्यांचे पदाधिकारी उपस्थित होते़
वंचितांसाठी धावले हजारो नाशिककर
By admin | Published: January 11, 2015 12:11 AM