अझहर शेख ।नाशिक : ‘मरावे परि कीर्ती रूपे उरावे’ असे बोलले जाते; मात्र ‘मरावे परि अवयवरूपी उरावे’ या उक्तीनुसार अवयवदान चळवळीमध्ये सहभागी होत मेंदू मृत झालेल्या व्यक्तींचे अवयव दान करत नातेवाइकांनी सामाजिक बांधिलकी जोपासली. आठ ते दहा नाशिककरांनी वर्षभरात तब्बल चौदा मूत्रपिंड, सहा यकृत आणि दोन हृदय गरजूंना दान करत त्यांचा मृत्यूशी सुरू असलेला संघर्ष थांबविण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला.माणसाचे शरीर हेदेखील एकप्रकारचे नैसर्गिक यंत्रच आहे असे म्हणणे वावगे होऊ नये. मानवी शरीराचा निकामी झालेला एखादा अवयव बदलता येऊ शकतो, एवढी प्रगती विज्ञानाने वैद्यकशास्त्रात केली आहे; मात्र यासाठी अस्सल सुटे भाग अर्थात अवयव कोणत्याही कारखान्यात तयार होत नाहीत. त्यामुळे अवयवदान हा एकमेव पर्याय सध्यातरी मानवापुढे आहे. माणुसकी जीवंत ठेवत सामाजिक ऋण फेडण्याच्या भावनेतून अवयवदान चळवळीमध्ये नागरिकांनी सहभागी होणे गरजेचे आहे. कारण अवयवाची गरज कधी कोणालाही भासू शकते. एक मेंदूमृत व्यक्तीच्या नातेवाइकांनी त्याचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतल्यास किमान आठ गरजूंना नवजीवन प्राप्त होऊ शकते.अवयवदान चळवळीला प्रारंभ होऊन शहरात जेमतेम वर्षभराचा कालावधी पूर्ण होत आहे; मात्र नाशिककरांनी या चळवळीचे महत्त्व जाणून गांभीर्याने विचार करत प्रतिसाद दिला. यामुळे सुरुवातीलाच चांगला प्रतिसाद मिळाला; मात्र ही चळवळ अधिकाधिक व्यापक होणे काळाची गरज आहे. यासाठी सामाजिक संस्थांसह वैद्यकीय क्षेत्राबरोबरच सरकारी पातळीवरूनदेखील जनजागृती केली जाणे गरजेचे आहे. वैद्यकीयक्षेत्रामध्ये डॉक्टरांनी मेंदू मृत व्यक्तीच्या नातेवाइकांचे अधिकाधिक प्रबोधन करून त्यांना अवयवदान संकल्पना व त्याचे महत्त्व पटवून देत मतपरिवर्तनासाठी प्रयत्न के ल्यास या चळवळीला अधिक बळ मिळू शकते.७२ टक्के भाजलेल्यांनाही जीवदानअनवधानाने किंवा आत्महत्येचा प्रयत्न करत व्यक्ती भाजल्याच्या घटना शहरात अनेकदा घडतात. त्वचा बॅँक सुरू झाल्यापासून शहरातील ७२ टक्के भाजलेल्या काही व्यक्तींनाही जीवदान देण्यात यश आले आहे. रोटरी क्लब व डॉ. राजेंद्र नेहेते यांनी पुढाकार घेऊन त्वचा बॅँक सुरू केली. ही त्वचा बॅँक उत्तर महाराष्टÑातील एकमेव असून, देशातील आठवी आहे.२०१६ साली सुरू झालेल्या या बॅँकेत अद्याप १५ मृत व्यक्तींच्या नातेवाइकांनी त्यांच्या मयत व्यक्तींची त्वचा दान के ली. यामुळे शहरात तीन गरजूंना तर उर्वरित त्वचा मुंबईच्या केंद्राकडे पाठविण्यात आली आहे. व्यक्ती मृत झाल्यापासून सहा तासांच्या आत त्वचा दान करता येते. त्वचा दानसंदर्भात सदर मयत व्यक्ती कुठल्याही दुर्धर व त्वचारोगाची रुग्ण नसावी, ही एकमेव अट असते.पुणे-मुंबईत प्रत्यारोपण वर्षभराच्या कालावधीत शहरातून मेंदू मृत झालेल्या व्यक्तींच्या नातेवाइकांनी पुढे येऊन रुग्णांचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. शहरातील दोन खासगी रुग्णालयांमध्ये नऊ मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आल्या. तसेच पुणे, मुंबई येथील रुग्णालयांत गरजूंना पाच मूत्रपिंड उपलब्ध करून देत प्रत्यारोपण करण्यात आले. याबरोबरच दोन हृदय व सहा यकृत पुण्याला गरजूंना अवयवदात्यांनी दान केल्यामुळे मिळू शकले.
२२ रुग्णांचा थांबला मृत्यूशी संघर्ष...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 1:15 AM