नाशिक : जिल्ह्यात गुरुवारी एकूण ११० नागरिक बाधित झाले असून, १३८ कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, ग्रामीणला झालेल्या एकमेव मृत्यूमुळे आतापर्यंतच्या बळींची संख्या ८६०१ वर पोहोचली आहे. मात्र, प्रलंबित अहवालांची संख्या पुन्हा हजारपार जाऊन ११८५ वर पोहोचली आहे.
जिल्ह्यात बाधितांपैकी ६९ ग्रामीणचे ३३ नाशिक महापालिकेच्या क्षेत्रातील, ७ जिल्हाबाह्य तर १ मालेगाव महापालिकेच्या क्षेत्रातील आहेत; तर प्रलंबित अहवालांची संख्या दोन आकड्यांवरून चार आकड्यांत पोहोचली आहे. जिल्ह्यातील ११८५ प्रलंबित अहवालांपैकी सर्वाधिक प्रलंबित अहवाल ६८५ हे नाशिक ग्रामीणचे, २६० मालेगाव महापालिकेचे, २४० नाशिक महापालिकेचे आहेत. समाधानाची बाब म्हणजे बाधितांपेक्षा कोरोनामुक्त अधिक झाल्याने एकूण उपचारार्थी रुग्णसंख्या ९०० पेक्षा कमी होऊन ८९९ वर आली आहे. त्यातदेखील सर्वाधिक उपचारार्थी ४८७ नाशिक ग्रामीणचे, ३८६ नाशिक महापालिकेचे, २० मालेगाव महापालिका, तर ६ जिल्हाबाह्य उपचारार्थी आहेत.