नाशिक : शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा याचि देहि याची डोळा अनुभवण्यासाठी नाशिक जिल्ह्यातून हजारो वाहनांमधून शिवभक्तांनी ५ जूनला दुपारी रायगडाकडे कूच करण्याचा निर्धार सकल मराठा समाजाने ठिकठिकाणी झालेल्या गुप्त बैठकांमधून व्यक्त केला आहे.
छत्रपती खा. संभाजीराजे भोसले यांच्या निर्देशानुसार मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक करण गायकर, राजू देसले, ॲड. शिवाजी सहाणे, तुषार जगताप, गणेश कदम, शिवा तेलंग, संदीप शितोळे, पूजा धुमाळ, माधवी पाटील यांच्यासारखे आजवर पहिल्या फळीत काम करणारे समन्वयक यावेळी प्रथमच बैठकांना मार्गदर्शन करीत आहेत.
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने नकार दिल्यानंतर समाजात निर्माण झालेल्या अस्वस्थतेला दिशा देण्यासाठी छत्रपतींचे वंशज खा. संभाजीराजे भोसले सक्रिय झाले असून, राज्य सरकारला केलेल्या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर यंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा लक्षवेधी ठरला आहे. येत्या दोन दिवसांत मराठा समाजाच्या मागण्यांवर सरकारने सकारात्मक भूमिका घेतली नाही तर शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या समारंभानंतर छत्रपती खा. संभाजीराजे भोसले रायगडावरून मराठा एल्गारची घोषणा करण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने शासन प्रशासनाकडून मराठा समाजाच्या बैठकांना प्रतिबंध लावला जात आहे. नाशिक जिल्हा सकल मराठा समाजाच्या बैठकीलाही प्रशासनाने परवानगी नाकारल्याने ठिकठिकाणी गुप्त बैठका घेऊन रायगड वारीचे नियोजन आखले जात आहे.
इन्फो...
आरोग्य नियमांचे करणार पालन
५ जूनला रायगडाकडे प्रस्थान करण्यापूर्वी शासनाची एसओपी पाळण्याची अट घालण्यात आली असून, प्रत्येकाने कारोना चाचणी करून पॉझिटिव्ह नसल्याची खात्री करून घ्यावी, एका वाहनात चार व्यक्ती, सोबत मास्क, सॅनिटायझर दोन दिवस पुरेल इतका शिधा, पिण्याचे पाणी बाळगण्याच्या सूचनाही दिल्या जात आहेत.