येवला : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या मूक मोर्चात शहरासह तालुक्यातून १२८० पेक्षा अधिक वाहनांमधून सुमारे २० हजार ओबीसी बांधवांसह भुजबळ समर्थक जनता सहभागी झाली होती. बहुजन समाजाचे नेते व येवला मतदारसंघाचे आमदार छगन भुजबळ यांनी येवला मतदारसंघात विविध विकासकामे करून कायापालट केला आहे. केवळ मतदारसंघातीलच नव्हे, तर राज्यभरातील सामान्य जनतेचे प्रश्न सोडविले आहेत. देशभरात दौरे करून त्यांनी सर्वांना आपल्या न्याय्य हक्कांची जाणीव करून दिली. सध्या त्यांच्यावर यंत्रणेकडून अन्याय होत असल्याने शहर व तालुक्यातून स्वयंस्फूर्तीने नागरिक मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते. नगरसूल येथून सुमारे १०० छोटी चारचाकी वाहने, पाच ट्रक व तीन बसेसमधून सुमारे तीन हजार नागरिक या मोर्चात सहभागी होण्यासाठी गेले होते. अंदरसूल येथून अॅड. सुभाषराव सोनवणे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, मकरंद सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक येथील मूक मोर्चात सहभागी होण्यासाठी दोन बसेस, दोन ट्रक यांसह १०० छोट्या वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. नाशिकला भुजबळ समर्थनार्थ मोर्चात सहभागी होण्यासाठी सोमवारी सकाळपासूनच औरंगाबादसह मराठवाड्याकडून गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या. पिवळ्या रंगाच्या झेंड्यावर छगन भुजबळ यांचे मोठे चित्र होते. गाडीच्या काचांवर स्टीकर लावण्याचे काम विंचूर चौफुलीवर कार्यकर्ते करत होते. छोट्या-मोठ्या वाहनांनी व कार्यकर्त्यांच्या घोषणांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. (वार्ताहर)
येवल्यातून हजारो समर्थक सहभागी
By admin | Published: October 03, 2016 10:48 PM