नाशिकरोड : बिटको महाविद्यालय ते श्री घंटी म्हसोबा मंदिरपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या बीएसएनएलच्या भूमिगत डकमधून अज्ञात चोरट्यांनी केबल चोरल्याने या भागातील ३ हजार दूरध्वनी व इंटरनेट सेवा शनिवारी रात्रीपासून बंद पडली आहे. नाशिकरोड भागामध्ये पहिल्यांदाच अशी घटना घडली असून, खंडित झालेली सेवा टप्प्याटप्प्याने आठवड्याभरात पूर्वपदावर येईल, असे बीएसएनएलच्या सूत्रांनी सांगितले. बिटको महाविद्यालय ते श्री घंटी म्हसोबा मंदिरापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा असलेली बीएनएनएलच्या भूमिगत डकमधून शनिवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी केबल तोडून चोरून नेली. यामुळे दत्तमंदिर सिग्नलपासून जय भवानीरोड, जगताप मळा, प्रधाननगर, खांडरेनगर, आनंदनगर आदि भागातील बीएसएनएलचे जवळपास ३ हजार दूरध्वनी व इंटरनेट सेवा बंद पडली. या भागातील रहिवाशांनी रविवारी सकाळपासून बीएसएनएलच्या ग्राहक तक्रार निवारण केंद्रात तक्रारी करण्यास सुरुवात केली. विशिष्ट भागातील दूरध्वनी बंद पडल्याच्या मोठ्या तक्रारी आल्याने बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी शोध घेण्यास सुरुवात केली असता बिटको महाविद्यालया- समोरील बीएसएनएलच्या भूमिगत डकमधून अज्ञात चोरट्यांनी केबल तोडून चोरून नेल्याचे उघडकीस आले. दूरध्वनी सेवा खंडित झाल्याने या भागातील रहिवासी, व्यापारी, इंटरनेट युजर्स प्रचंड त्रस्त झाले आहेत.चोरीला गेलेली केबल टाकण्यासाठी सोमवारी सायंकाळपर्यंत केबल बीएसएनएलच्या नाशिकरोड कार्यालयात येणार होती. केबल टाकल्यानंतर मंगळवारी सायंकाळपर्यंत आनंदनगर, गायखे कॉलनी, गंगोत्रीनगर या भागातील खंडित झालेली सेवा पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र खंडित झालेली सेवा टप्प्याटप्प्याने सुरू होईल. याकरिता आठवडाभराचा कालावधी लागेल, असे बीएसएनएलच्या सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)
चोरीचा गुन्हा दाखलबिटको कॉलेज ते श्री घंटी म्हसोबा मंदिरापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा असलेली भूमिगत डकमधील ७ लाख ८९ हजार ४१२ रुपयांची केबल चोरीला गेल्याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात उपअभियंता संपत काळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकरोड भागात पहिल्यांदाच डकमधून बीएसएनएलची केबल चोरी झाली आहे.