खमताणे : गेल्या आठ-दहा महिन्यांपासून चाळीत पडून राहिल्याने सडून चाललेला हजारो टन उन्हाळी कांदा आणि शेतात पडून असलेल्या लाल कांद्यालाही अपेक्षित भाव मिळेनासा झाल्याने कसमादे परिसरातील शेतकरी वर्ग हतबल झाला आहे. परिसरात हजारो टन उन्हाळी कांदा चाळींमध्ये पडून असल्याने त्याची विल्हेवाट कशी लावावी, हा प्रश्नही आता शेतक-यांना सतावू लागला आहे.यावर्षी कांद्याला चांगला भाव मिळेल म्हणून शेतक-यांनी आठ ते दहा महिन्यांपासून चाळींमध्ये त्याची साठवण केलेली आहे. सात-आठ महिन्यांत काही ठराविक कालावधी वगळता यावर्षी उन्हाळी कांद्याला अत्यल्प भाव मिळत आहे. वर्षभर साठवून ठेवलेला कांदा फुकट देण्याची वेळ शेतक-यांवर येवून ठेपली आहे. उन्हाळी कांद्याला कमीत कमी १०० रुपये तर सरासरी २०० ते ३०० रु पये भाव मिळत आहे. या भावात शेतक-यांचे ट्रॅक्टर भाडे, हमाली खर्च, कांदा उत्पादन घेण्यासाठी झालेला खर्च यात मोठी तफावत निर्माण झाली आहे. त्यामुळे उन्हाळा कांदा विक्रीसाठी आणतानाही शेतक-यांना दहादा विचार करावा लागत आहे. चालू वर्षीचा खरीप हंगामही खराब हवामानामुळे वाया गेला होता.आताही अत्यल्प भाव मिळत असल्याने कसमादे पट्टयातील शेतकरी पूर्णत:आर्थिक व मानसिक विवंचनेत सापडला आहे. सध्या अनेक शेतक-यांचा कांदा चाळीमध्ये पडून आहे. तर काही शेतक-यांचा लाल कांदा शेतामध्ये पडलाआहे. उन्हाळी कांद्यापाठोपाठ लाल कांद्याचीही हीच अवस्था बनली आहे. कांद्याबरोबरच टोमॅटो उत्पादक शेतक-यांनाही आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे .
हजारो टन उन्हाळी कांदा चाळीत पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 3:52 PM
शेतकरी हतबल : विल्हेवाट लावण्याबाबत चिंता
ठळक मुद्देउन्हाळी कांद्याला कमीत कमी १०० रुपये तर सरासरी २०० ते ३०० रु पये भाव मिळत आहे.