नाशिक : भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर खळबळजनक आरोप केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारमधून बाहेर पडण्याच्या विषयावर नरमाईची भूमिका घेतली आहे. त्यामुळे सोमय्या यांच्या आरोपात पहिल्यांदाच सत्यता असल्याचे दिसून येत आहे. भाजपाला या सर्व आरोपांतील सत्यता माहिती असताना सत्तेत एकत्र राहून सरकार जनतेची दिशाभूल करीत आहे. असे सांगत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी युती सरकारवर टीकेची झोड उठवली. जुना आडगाव नाका परिसरातील वालझाडे मंगल कार्यालयात महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी सुप्रिया सुळे यांनी सत्ताधारी पक्षांवर टीकेची झोड उठवताना हे सरकार केवळ खोटी आश्वासने देणारे असून, सरकारचा विकासापेक्षा जाहिरातबाजीवर अधिक भर असल्याचे सांगितले. मुंबई महापालिकेत गेल्या २५ वर्षांपासून सत्तेत असलेले युतीतील शिवसेना व भाजपा पक्ष राज्यात सत्तेत आल्यानंतर अडीच वर्षांत त्यांच्यात मतभेद चव्हाट्यावर आले असून, जनतेच्या प्रश्नांकडे मात्र हे सरकार दुर्लक्ष करीत असल्याचे त्या म्हणाल्या. केंद्र सरकारने जनतेच्या अपेक्षांचा भ्रम निरास केला आहे. वायफाय डिजिटल इंडियाचे स्वप्न दाखवून जनतेची फसवणूक करणाऱ्या सरकारने नोटाबंदी लादून सर्वसामान्यांच्या खिशातील पैसे काढून घेतले असल्याचा आरोप सुळे यांनी केला.
सोमय्यांच्या आरोपानंतर उद्धव ठाकरे नरमले
By admin | Published: February 16, 2017 1:45 AM