नाशिक : सध्या उच्च शिक्षण, तंत्रशिक्षण, पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्याने नाशकातील रोजगार व उद्योजकता मेळाव्यास इच्छुक उमेदवारांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाला. त्यामुळे रोजगाराची संधी प्राप्त करण्यासाठी भरती असो रोजगार मेळाव्याला नेहमी उसळणारी गर्दी नाशकातील रोजगार व उद्योजकता मेळाव्यातून हरवल्याचे चित्र दिसून आले. नाशिक जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि कर्मवीर अॅड. बाबूराव गणपतराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्यातर्फे ठाकरे महाविद्यालयात मंगळवारी ‘रोजगार व उद्योजकता मेळावा’ घेण्यात आला. या मेळाव्यात रोजगाराची संधी देणाºया पूर्वनियोजित १७ कंपन्यांमध्ये ऐनवेळी पाच कंपन्यांची वाढ झाली. नियुक्ती करणाºया कंपन्यांची संख्या १७ वरून २२ झाल्याने उपलब्ध जागांची संख्याही ५६८ वरून ६०४ पर्यंत वाढली. परंतु, रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणांचा मेळाव्याला प्रतिसाद मिळण्याचा आयोजकांना विश्वास असताना यावेळच्या रोजगार मेळाव्यातून गर्दीच हरविल्याचे दिसून आले.सध्या विविध अभ्यासक्रमांचे शिक्षण घेत असलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्याने यावेळी ६०४ नोकºया उपलब्ध असताना या मेळाव्यात केवळ २७६ विद्यार्थ्यांनीच नोंदणी करून सहभाग घेतला. त्यातील २४४ विद्यार्थ्यांची प्राथमिक निवड करण्यात आली असून, पुढील टप्प्यात यातील बहुतांश उमेदवारांना विविध कंपन्यांमध्ये नोकरीची संधी मिळणार असल्याचा विश्वास कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक संचालक संपत चाटे यांनी यावेळी व्यक्त केला.महामंडळाकडून उद्योजकता मार्गदर्शनठाकरे महाविद्यालयातील रोजगार व उद्योजकता मेळाव्यात अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासह महात्मा फुले महामंडळ, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळ, महिला आर्थिक विकास महामंडळ व वसंतराव नाईक महामंडळ यांनी विविध घटकांतील उमेदवारांना व्यवसाय व उद्योग सुरू करण्यासाठी मार्गदर्शन करतानाच महामंडळांकडून राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. यात महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रानेही उद्योग सुरू करण्यास इच्छुक उमेदवारांना मार्गदर्शन केले.
रोजगार उद्योजकता मेळाव्यातून हरवली गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 12:22 AM