अभियंत्यांचे हितसंबंध : पोलीस संरक्षणाची मागणी
नाशिक : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दक्षिण विभागातील लाचखोर कार्यकारी अभियंता पवार, सहायक अभियंता पाटील व शाखा अभियंता देशपांडे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करणाºया शासकीय ठेकेदाराच्या घरी जाऊन या अभियंत्यांचे राजकीय हितचिंतक व गुंडप्रवृत्तीचे लोक तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकत आहेत़ त्यामुळे आपल्यासह कुटुंबीयांच्या जीवितास धोका असून, आपल्याला पोलीस संरक्षण मिळावे, अशी मागणी तक्रारदाराने पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांच्याकडे केली आहे़ तसेच आपल्या व कुटुंबीयांचे काही बरे-वाईट झाल्यास संबंधित आरोपी व हितसंबंधितांना जबाबदार धरण्यात यावे, असेही या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे़शासकीय ठेकेदार युवराज पुंडलिक मोहिते (रा़ दिंडोरीरोड) यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उज्ज्वल कन्स्ट्रक्शन या फर्मद्वारे गत दहा वर्षांपासून मी शासकीय ठेकेदार म्हणून काम करीत आहे़ गत दोन वर्षांपासून केलेल्या वेगवेगळ्या कामांची देयके सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्रलंबित आहेत. यासाठी कार्यालयात वारंवार खेटा मारूनही दक्षिण विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र पवार, सहायक अभियंता सचिन पाटील, शाखा अभियंता अजय देशपांडे यांनी बिल काढून दिले नाही़ तसेच वेळोवेळी पैशांची मागणी करून मानसिक व आर्थिक छळ केला यामुळे परिस्थिती हलाखीची झाली़अभियंत्यांकडे वारंवार बिल मागण्याची विनंती केली असता त्यांनी ६ लाख रुपयांची मागणी केली़ याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असता या विभागाची कारवाई सुरू असताना अभियंत्यांचे राजकीय हितचिंतक व गुंडप्रवृत्तीच्या लोकांनी एसीबी कार्यालयात गर्दी केली होती़ तसेच दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता़ कार्यकारी अभियंता देवेंद्र पवार यांचे नातेवाईक मोठ्या राजकीय पदावर असून पाटील व देशपांडे या दोघांचेही राजकीय व बड्या व्यक्तींशी जवळीक आहे़शनिवारी (दि़१४) सकाळपासून पवार यांचे हितसंबंधी लोक दोन वेळा मोहिते यांच्या घरी गेले व तक्रार मागे घ्यावी आणि प्रकरण मिटवून घ्यावे, यासाठी दबाव टाकत असल्याचेही या निवेदनात म्हटले आहे़या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, गृहमंत्री, राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते, विधान परिषद विरोधी पक्षनेते, विधानसभा अध्यक्ष, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक, पंचवटीचे सहायक पोलीस आयुक्त व म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना देण्यात आल्या आहेत़ कुटुंबीयांना धोकालाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केलेल्या या तिन्ही अभियंत्यांशी संबंधित राजकीय व्यक्ती व मोठ्या व्यक्तींकडून आपणास तसेच आपल्या कुटुंबीयांना धोका असून, संबंधितांवर प्रतिबंधक कारवाई करावी तसेच पोलीस संरक्षण मिळावे, अशी मागणीही मोहिते यांनी निवेदनाद्वारे केली आहे़