लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : बदनामीकारक व्हिडीओ तयार करून तो ‘यू ट्यूब’वर टाकून बदनामी करण्याची धमकी देत दररोज चार हजार रुपये खंडणी उकळल्याप्रकरणी मालेगाव डेव्हलपमेंट फ्रंटचा अध्यक्ष एतेशाम शेख, ओसामा आजमी, इम्रान रशीद व त्यांच्यासोबत असलेले यू ट्युब चॅनेलचे दोन प्रतिनिधी यांच्याविरोधात आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुनीर अहमद शकील अहमद (रा. किल्ला रविवार वार्ड) यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. अली अकबर हॉस्पिटल येथे फिर्यादीचे सरकारमान्य आधार केंद्रात १८ जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजता ही घटना घडली. यावेळी आरोपींनी फिर्यादीकडे येऊन ‘आम्ही सांगू तेव्हाच आधार केंद्राचे स्लॉट ओपन करायचे. आम्ही ते बुक करू. तुझ्याकडे जे लोक येतील, त्यांना आमच्याकडे पाठवायचे, असे दररोज ४० ग्राहक माझ्याकडे पाठविल्यानंतर आम्ही त्यांच्याकडून प्रत्येकी १०० रुपये घेऊ. तू शासकीय फी घेत जा. असा तुझ्याकडून चार हजार रुपयांचा रोजचा धंदा झाला पाहिजे तरच आम्ही तुझ्याविरोधात बदनामीकारक व्हिडीओ बनविणार नाही अन्यथा तुझे आधार केंद्र बंद करू’, अशी भीती घालून या सर्वांनी फिर्यादीकडे ४ हजार रुपये खंडणी स्वरूपात धंदा करून देण्याची मागणी केली. ती मागणी फिर्यादीने पूर्ण केली नाही म्हणून फिर्यादीविरोधात फिर्यादी हा आधार सेंटरवर ग्राहकांकडून ३०० रुपये घेत असल्याचा बनावट ग्राहक उभा करून व्हिडीओ बनवून ‘यू ट्यूब’वर अपलोड करून बदनामी करण्यात आली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस नाईक शिरोळे करत आहेत.