नाशिक : जागेच्या व्यवहाराचे सर्व पैसे दिले असतानाही पती-पत्नीने जागा विकायची असेल तर पाच लाख रुपये द्या, अन्यथा खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जेलरोड लोखंडे मळा येथे राहणाऱ्या विशाल विलास साळवे यांनी या प्रकरणात फिर्याद दिली आहे. साळवे याची आई शोभा साळवे यांच्या नावावर कांचन खरे व रेखा सोनवणे यांच्या मालकीची एक गुंठा जागा १८ नोव्हेंबर २०११ मध्ये विकत घेतली होती.
विक्री करारनाम्याचा दस्त कांचन खरे, रेखा सोनवणे यांच्यावतीने जनरल मुखत्यारपत्रधारक भारती साहेबराव अहिरे यांनी लिहून दिला आहे. अहिरे यांना साडेचार लाख रुपये चेकने व रोख एक लाख रुपये दिले. घरपट्टी व लाईट बिलावर शोभा साळवे यांचे नाव असून, त्यांनी ती जागा विक्रीसाठी काढली. भारती अहिरे व तिचे पती साहेबराव अहिरे यांनी साळवे यांना फोन करून जागामालक मी आहे, विक्रीचा व्यवहार मी करेन, तुम्हाला व्यवहार करायचा असेल तर मला पाच लाख रुपये द्या, अन्यथा खोट्या गुन्ह्यात अडकवेन, अशी धमकी दिली. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात साळवे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.