नाशिकरोड : पैसे घेऊन पळून गेलेल्या युवकाच्या मित्राकडेच चौघा जणांनी दहा लाखांची मागणी करून संपूर्ण कुटुंबाला जिवे ठार मारण्याची धमकी देत सहा लाख २० हजार रुपयाची खंडणी वसूल केल्याप्रकरणी चौघा जणांविरूद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.तिडके कॉलनी येथील अनमोल बिल्डिंग येथील अभिषेक माणकचंद जैन यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गेल्या १३ एप्रिल रोजी मित्र राजकुमार संचेती रा. ड्रीमसिटी हा फिर्यादी अभिषेक याला घेऊन जेलरोड नारायणबापू नगर येथील कैलास मैंद यांच्या कार्यालयात गेला. संचेती याच्या सांगण्यावरून कैलास मैंद याने फिर्यादी अभिषेक जैन याच्या बॅँकेच्या खात्यात सहा लाख १० हजार रुपये आरटीजीएसमार्फत जमा केले. त्यानंतर अभिषेक याच्याकडून बॅँकेच्या खात्यात जमा झालेली ६ लाख १० हजार रुपयांची रक्कम राजकुमार संचेती याने घेतली. मात्र त्यानंतर २९ एप्रिल पासुन राजकुमार संचेती हा फरार झाल्याने कैलास मैंद व त्याचे इतर ३ साथीदार हे अभिषेक याच्याकडे दहा लाख रुपयांची मागणी करत होते. पैसे दिले नाही तर अभिषेक व त्याच्या कुटुंबीयाला जिवे ठार मारण्याची धमकी देत होते.कैलास मैंद, संदीप पिंगटे ऊर्फ मास्टर, आबा चौधरी, संतोष सहाणे यांनी अभिषेकच्या मित्राने घेतलेल्या पैशांच्या मोबदल्यात १० लाख रुपयांची मागणी केली होती.
जिवे ठार मारण्याची धमकी; चौघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 12:42 AM