नाशिक : गणेशोत्सव हा आनंद आणि उत्साहाचा सण असताना मंडळांना मंडप धोरणाच्या अटींसाठी अडवणूक करून कारवाईच्या धमक्या दिल्या जातात आणि करावाईदेखील केली जात असल्याने मंडळांचे पदाधिकारी संतप्त झाले आहेत. खोटी कलमे लावून मंडळांना त्रास देण्याच्या प्रकाराच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त करतानाच या मंडळ पदाधिकाऱ्यांनी एकवेळ उत्कृष्ट पुरस्कार देण्याच्या नावाखाली उपकृत करण्याऐवजी मंडपाच्या अटी शिथिल करा आणि मुख्य म्हणजे कारवाई करू नका, असा निर्वाणीचा इशारा गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी (दि.२३) महापालिकेला दिला आहे. गावठाणात मंडपाच्या जाचक अटी लादल्यास या भागातून उत्सव हद्दपार होईल,अशी भीती यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. मनपाच्या वतीने गणेश उत्सवपूर्व मंडळांच्या कार्यकर्त्यांची बैठक राजीव गांधी भवनात शुक्रवारी (दि.२३) पार पडली. यावेळी कार्यकर्त्यांनी या भावना व्यक्त केल्या.सरकार ३७० कलम हटवून काश्मीरला मुक्त करते मग नाशिक महापालिकेने तरी गणेश मंडळांवर ४२० सारख्या फसवणुकीच्या खोट्या केसेस लावून त्रास का देते अशा शब्दात कार्यकर्त्यांनी सुनावल्याने पदाधिकारी आणि अधिकारी स्तंभित झाले. मंडप धोरणाची नियमावली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तयार करण्यात आल्याचे सांगून महापौर रंजना भानसी व आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी संबंधितांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. महापालिकेच्या वतीने मंडळांना सवलती देण्यापेक्षा कायदाच अधिक शिकवला जातो. मंडप धोरणातील जाचक तरतुदी दाखवून परवानगी प्रक्रि येत जाणीवपूर्वक खोडा घातला जात असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. उत्सव काळात तरी महापालिकेने शांततेने कामकाज करून सहकार्य केले पाहिजे, अशा मागण्या कार्यकर्त्यांनी केल्या. यावेळी मंडळांच्या प्रतिनिधींनी जाहिरात कर माफ करावा, मिरवणूक दुपारी १२ वाजता सुरू करायची असल्यास लोकप्रतिनिधींनी वेळेवर उपस्थित रहावे अशा मागण्या स्थायी समितीचे सभापती उद्धव निमसे, भाजपा गटनेता जगदीश पाटील, गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे, पोपट नागपुरे, रामसिंग बावरी, नंदू कहार, पद्माकर पाटील, स्वप्नील घिया, बबलू परदेशी, लक्ष्मण धोत्रे, शंकर बर्वे, हेमंत जगताप, नंदन भास्करे, मदन दायमा, सचिन डोंगरे, करणसिंग बावरी आदींनी केल्या. अतिरिक्त आयुक्त बी. जी. सोनकांबळे यांनी मंडप धोरणाची माहिती दिली. बैठकीस उपमहापौर प्रथमेश गिते, सभागृहनेते सतीश सोनवणे, मनसेच्या गटनेत्या नंदिनी बोडके, रिपाइंच्या गटनेत्या दीक्षा लोंढे, नगरसेविका स्वाती भामरे, तसेच मनपा, पोलीस व अधिकारी उपस्थित होते.खड्डे तातडीने बुजवा : महापौरसध्या पावसाळ्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात खड्डे झाले असून, किमान गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावरील खड्डे तातडीने बुजवावे, असे आदेश महापौर रंजना भानसी यांनी यावेळी दिले. मिरवणूक मार्गातील अतिक्रमणे काढावीत तसेच ओव्हरहेड केबल काढाव्यात, सर्वात महत्त्वाचे म्हणजे गणेश मंडळांच्या रखडलेल्या परवानग्या तातडीने द्याव्यात, अशा प्रकारचे आदेश त्यांनी दिले.शहरातील रखडलेल्या स्मार्ट रोडविषयी विविध मंडळांच्या पदाधिकाºयांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. त्यावर आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी रस्त्याचे काम वेळेतच पूर्ण होईल, परंतु नाही झाले तर काय करायचे मी बघून घेईल, असे स्पष्ट केल्याने ठेकेदारावर आणखी कडक कारवाई होण्याची शक्यता वर्तवलीजात आहे.
कारवायांच्या धमक्यांनी गणेश मंडळे संतप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 1:24 AM