नाशिक : शहरातील रविवार कारंजा येथील अतिप्राचीन पेशवेकालीन सुंदर नारायण मंदिराला झळाळी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, राज्य पुरातत्व विभागाच्या अखत्यारित असलेल्या या संरक्षित स्मारकाची दुरुस्ती केली जात आहे; मात्र या दुरुस्तीच्या कामात चोरट्यांनी खोडा घातल्याने संताप व्यक्त होत आहे.
नव्याने दगड घडविण्यासाठी लागणारा कारागीरवर्ग तामिळनाडूमधील आहे. मंदिरासाठी लागणारे दगड नांदेडमधून आणले जात आहे. पहिल्या टप्प्याच्या बांधकाम दुरुस्तीसाठी राज्य पुरातत्व विभागाकडे मंत्रालयाकडून सुमारे पावणेपाच कोटी रुपयांचा निधीही प्राप्त झाला आहे. त्यानुसार कामाला प्रारंभ करण्यात आला असून, मुख्य शिखरावरील कळस क्रेनच्या सहाय्याने उतरविल्यानंतर रात्रीच्या सुमारास मंदिराच्या प्रांगणात उभ्या असलेल्या क्रेन, मालवाहू ट्रकच्या बॅटऱ्या अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याने कामाला सुरुवात झाल्याबरोबरच ‘विघ्न’ आले. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून धोकादायक दगड उतरविण्याचे काम ठप्प झाले आहे.
मंदिराच्या प्रांगणात तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जावे जेणेकरून चोरट्यांवर वचक निर्माण होईल, अशी मागणी भाविकांनी केली आहे. रात्रीच्या सुमारास गस्तीदरम्यान पोलिसांनी मंदिराच्या प्रांगणाजवळ काही वेळ थांबणे गरजेचे आहे. क्रेनच्या दोन्ही बॅटºया चोरट्यांनी पळविल्याने क्रेन बंद पडले आहे.