सटाणा : पाच महिन्यांच्या गर्भपातासाठी बांधकाम ठेकेदार बापलेकांनी पेट्रोल टाकून गर्भवतीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. ही घटना स्त्रीभ्रूणहत्येस नकार दिला म्हणूनच पोटातील बाळासह मातेलाच संपविण्याचा कट या बापलेकांनी रचला असल्याची चर्चा आहे. असे असले तरी संबंधितांच्या अटकेनंतर यामागील सत्य समोर येणार आहे. दरम्यान, यातील तिघे संशयित आरोपी अद्याप फरार आहेत़ शहरातील अंबिकानगर येथे बांधकाम ठेकेदार दशरथ गंगाधर कुमावत ऊर्फ दशरथ खन्ना, विलास कुमावत, योगेश कुमावत या तिघा बापलेकांनी संगनमत करून गेल्या शनिवारी (दि. २४) रात्रीच्या सुमारास पाच महिन्याची गर्भवती रूपाली विलास कुमावत हिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. याच्यात रूपाली गंभीर भाजली आहे. उपचारासाठी तिला नाशिक येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पोटाचा भाग मोठ्या प्रमाणात भाजल्याने रूपालीची व पोटातील बाळाची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेमागील कारण दुसरेच असल्याचे बोलले जात असल्याने त्याला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे. सात वर्षांपूर्वी बांधकाम ठेकदार दशरथ खन्ना याचा मुलगा विलास याने रूपालीसोबत प्रेमविवाह केला. विलासपासून रूपालीला तीन मुले आहेत.
गर्भवती जळीत प्रकरणातील तीन आरोपी फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 1:52 AM