पंचवटी : परिसरात खून, दरोडे, तसेच जिवे मारण्याचा प्रयत्न असे विविध गुन्हे दाखल असलेला सराईत बालगुन्हेगार पाप्या शेरगिल याच्या खूनप्रकरणी पंचवटी पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. संशयितांमध्ये दोघा विधिसंघर्षित बालकांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. काल मंगळवारी (दि. ७) शेरगिल याची पेठरोडवरील मोती सुपार मार्केट परिसरातील एका हॉटेलसमोर तिघांनी धारदार शस्त्राने हल्ला करून खून केला होता. या घटनेतील मयत शेरगिल याने काही दिवसांपूर्वीस संशयित विधिसंघर्षित बालकांना वेगवेगळ्या कारणांवरून मारहाण केली असल्याचे संशयितांनी पोलिसांना सांगितले. या घटनेत पोलिसांनी गणेश बल्ला याच्यासह दोघा विधिसंघर्षित बालकांना ताब्यात घेतलेले आहे. मयत सराईत बालगुन्हेगार शेरगिल हा विनाकारण त्या विधिसंघर्षित बालकांना मारहाण, दमबाजी करायचा तसेच काही दिवसांपासून तो परिसरातीलच एका युवतीची वारंवार छेड काढायचा, याच कारणावरून संशयित बालगुन्हेगारांनी पाप्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केल्याची घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. (वार्ताहर)
बालगुन्हेगाराच्या खूनप्रकरणी तिघे ताब्यात
By admin | Published: February 09, 2017 12:51 AM