मालेगाव :- नशेसाठी वापरली जाणारी औषधे ( कुत्ता गोळी) बाळगणाऱ्या तिघा संशयितांना विशेष पोलीस पथकाने अटक केली. आझादनगर व आयशानगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत केलेल्या कारवाईत ७० हजार ४३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वाढती नशेखोरी गुन्हेगारीचे मूळ ठरत आहे. नशेच्या आहारी गेलेल्या तरुणांकडून गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडत असल्याचा प्रकार समोर येत आहे. याची गंभीर दखल अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी घेतली आहे. नशेच्या औषधांची बेकायदा विक्री करणाऱ्यांवर कारवाईच्या सूचना केल्या आहेत. विशेष पथकाने गोपनीय माहिती मिळवून दोन ठिकाणी वेगवेगळ्या कारवाया केल्या. अली अकबर हॉस्पिटलसमोरील मैदानात विक्रीच्या हेतूने कुत्ता गोली व खोकल्याच्या बाटल्या बाळगणाऱ्या एजाज अली नियाज अली व सईद हबीब शेख यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून अल्पाझोलम (कुत्तागोली) गोळ्यांची ३७ पाकिटे जप्त केली. यानंतर जिनत मेडिकलजवळ संशयितरित्या फिरणाऱ्या मोहंमद आसिफ शकील अहमद याला पकडले. त्याच्या अंग झडतीत ८ गोळ्यांची पाकिटे व खोकल्याच्या १७ बाटल्या सापडल्या. याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ही कारवाई विशेष पोलीस पथकातील पोलीस उपनिरीक्षक आर. के. घुगे, भूषण खैरनार, वसंत महाले, पंकज भोये, संदीप राठोड प्रकाश बनकर आदींनी केली.
नशेची औषधे बाळगणाऱ्या तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 4:26 AM