मृत विवाहितेचा पती प्रमोद दिलीप गायकवाड (३४), सासू मीना दिलीप गायकवाड (५५), नणंद नूतन दिलीप गायकवाड (२७, रा. सर्व मनमाड, ता. नांदगाव) अशी संशयितांची नावे आहेत. पल्लवी प्रमोद गायकवाड या महिलेने रविवारी (दि. १७) दुपारी तीन वाजेच्या सुमारास महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण प्रबोधिनीमध्ये कर्मचारी वसाहतीत वडिलांच्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी मृत महिलेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून तिघा संशयितांकडून लग्न झाल्यापासून पल्लवीचा वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ केला जात होता. घर व चारचाकी घेण्यासाठी तिला माहेरून पैसे आणण्यासाठी वारंवार त्रास दिला जात होता असे तक्रारीत म्हटले आहे. त्यांच्या जाचाला कंटाळून अखेर पल्लवीने आत्महत्या केल्याची वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत मनमाड येथून संशयितांना अटक केली आहे.
---
मोबाइल चोरांचा उपद्रव सुरूच
नाशिक : शहरातील बाजारपेठांमध्ये भुरट्या चोरांचे प्रमाण वाढले असून मोबाइल, पर्समधून दागिने पळविण्याचे प्रकार घडत आहेत. नुकतेच दोन ठिकाणी बाजारपेठेत खरेदी करत असलेल्या दोघा ग्राहकांचे मोबाइल चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली.
योगेश विठ्ठल भाटी (रा. शांतीपार्क उपगनर) यांनी तक्रार दाखल केलेल्या तक्रारीनुसार भाटी हे खरेदीसाठी मेन रोड व परिसरात फिरत असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या खिशातील मोबाइल लंपास केला.
दुसरी घटना काठे गल्ली परिसरात घडली. येथील संकेत मनोज बुरड (रा. त्रिकोणी गार्डनजवळ) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार ते जय शंकर गार्डन लॉन्स परिसरात भाजी खरेदी करत असताना शर्टच्या खिशातून चोरट्यांनी मोबाइल गायब केला. या दोन्ही घटनांप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---
विनयनगरला घरफोडीत ८८ हजारांचे दागिने लुटले
नाशिक : विनयनगर परिसरातील एका बंद घराला चोरट्यांनी लक्ष्य करत कुलूप तोडून दागिन्यांसह रोकड असा ८८ हजारांचा ऐवज लुटून पोबारा केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी फिर्यादी अभिषेक पगार (२२, रा. सिद्धिविनायक मंदिराजवळ, विनयनगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पगार कुटुंबीय बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी सोमवारी भरदुपारी बारा वाजेच्या सुमारास त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. बेडरूममधील लाकडी कपाटातून सोन्याचे दागिने व ४० हजार रुपयांची रोकड असा एकूण ८८ हजाराचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---
तडीपार सराईत गुंडाला पेठरोडला ठोकल्या बेड्या
नाशिक : शहर व जिल्ह्यातून दोन वर्षांसांठी हद्दपार केले असतानाही शहरात मोकाट फिरणाऱ्या एका तडीपार सराईत गुंडाला पंचवटी पोलिसांनी सोमवारी दुपारी पेठरोड परिसरात बेड्या ठोकल्या. दीपक किसन चोथे (३२, रा. अश्वमेधनगर) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुंडाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील गुन्हेगारी कमी करण्याच्या उद्देशाने परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्तांनी दीपक यास शहर तसेच जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले होते. असे असतानाही तो शहरात वावरत असल्याची महिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्यास अटक केली. चोथे यावर पंचवटी पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत.