मालेगावमधून शहरात दाखल होत वर्दळीच्या ठिकाणांहून नागरिकांच्या दुचाकी लांबविणे आणि मालेगावमध्ये दुचाकींचा ‘लूक’ बदलून शेजारच्या जिल्ह्यांत विक्री करणारी टोळी गजाआड करण्यास पोलिसांना यश आले आहे. संशयित अरबाज हसन अन्सारी (२१), मोहमंद रमजान इब्राहिम अन्सारी (२२), मोहमंद आदिल अन्सारी (२२), मोहमद तोहीद अन्सारी (२४), इमरान हासरत हुसेन अन्सारी (२५), अशी अटक केलेल्या दुचाकी चोरांची नावे आहेत.
गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरिक्षक आनंदा वाघ यांच्या पथकाने मालेगाव येथील मनमाड चौफुलीवर सापळा रचला. तेथूनही संशयितांना ताब्यात घेत त्यांच्याकडून १ लाख ७५ हजार रुपयांच्या तीन दुचाकी व ३० हजार रुपयांचे तीन मोबाइल असा एकूण २ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात दोन दुचाकी चोरल्याची कबुली चोरट्यांनी दिली. चोरट्यांकडे केलेल्या सखोल चौकशीत त्यांनी पहाटेच्या सुमारास नाशिक शहरात येऊन दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून आणखी दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.