मालेगाव : शहरातील नागछाप झोपडपट्टी भागात असलेल्या मणियार पोल्ट्री गोदामामधुन घरफोडी करुन अज्ञात चोरट्यांनी ३ लाख ४० हजार रुपयांची रोकड चोरुन नेली होती. याप्रकरणी शहर पोलीसांनी तपासाची चक्रे गतीमान करीत तिघा चोरट्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीला गेलेली ३ लाख ४० हजार रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी पत्रकार परिषदेत दिली.याप्रकरणी गेल्या २८ आॅक्टोबर रोजी जमील मोहंमद शरीफ मणियार या व्यापाºयाने शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करुन ३ लाख ४० हजारांची रोकड चोरुन नेल्याप्रकरणी फिर्याद दिली होती. पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व्ही. एन. ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीसांनी अवघ्या ४८ तासात या धाडसी घरफोडीचा छडा लावला आहे. नागछाप झोपडपट्टीला लागलेल्या आगीची संधी साधत गोदामात कामाला असलेला अबु उर्फ मोहंमद सुफियान अतिक अहमद (२१), शाहरुख शहा युसुफ शहा (२२) रा. दोघे हजार खोली, राशीद उर्फ मोहंमद बेग उर्फ मोहंमद बेग सलीम बेद (२२) रा. कमालपुरा यांनी रोकड चोरल्याच्या संशयावरुन पोलीसांनी अटक केली होती. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीसांनी पोलीसी खाक्या दाखविल्यानंतर त्यांनी घरफोडी केल्याची कबुली दिली. अबु उर्फ मोहंमद सुफियान अतिक अहमद याच्या घराची पोलीसांनी झडती घेत त्याच्या घरातील बंद कुलरमध्ये ७० हजार रुपये तर शाहरुख शहा युसुफ शहा याच्या घरातील फ्रीजमध्ये १ लाख ३८ हजार, राशीद उर्फ मोहंमद बेग याच्या घरातील कपाटातुन १ लाख ३२ हजार रुपये असे एकूण ३ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक एम. के. माळी यांनी या गुन्ह्याचा तपास केला. सदर कारवाई उपनिरीक्षक माळी, पोलीस हवालदार सचिन निकम, प्रकाश बनकर, प्रशांत पवार, विशाल गोसावी, अमोल शिंदे, तुषार अहिरे आदिंनी केली.