मनमाड : महावितरण कार्यालयात काम करणारे अधिकारी आणि कंत्राटी ठेकेदार यांच्या संगनमताने शहरातील ३५ वर्षीय तरुणाची तक्रार निवारण करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या महावितरणच्या अधिकाऱ्यासह कंत्राटी ठेकेदारास लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहारातील ३५ वर्षीय तरुणाच्या घराच्या छतावरील पाईपला ३३ के.व्ही.च्या बंदस्थितीत विद्युत वाहक तारा अनधिकृतपणे बांधल्या होत्या. त्या काढण्यासाठी तक्रारदार यांनी महावितरण कार्यालयात अर्ज केला होता. कार्यालयाने कायदेशीर बाबींची पूर्तता न करता त्यांच्या मर्जीतील खासगी कंत्राटदार नेमले. खासगी कंत्राटदार यांनी तक्रारदार यांच्याकडे त्यासाठी २० हजार रुपयांची मागणी केली. २० हजार रुपये घेण्यासाठी कंत्राटी ठेकेदार फिर्यादीच्या दुकानात येऊन लाचेची रक्कम स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. यामध्ये सहाय्यक अभियंता महेंद्र श्रावण चव्हाण (वय ३७, रा. नवकार रो- हाऊस नंबर ६, शरयू पार्क -२, जत्रा हॉटेलजवळ, आडगाव, नाशिक), खासगी कंत्राटदार कुणाल दादा ठाकरे (३०, रा. शिक्षक कॅालनी, मनमाड, नाशिक), कंत्राटदार अंकुश मोठाभाऊ डुकळे (२९, मु. पो. झाडी, ता. मालेगाव) या तिघांना ताब्यात घेतले आहे.