उमराणे : देवळा तालुक्यातील खारीपाडा येथे तीन ते चार दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घालत तीन वासरे फस्त केली आहेत. या घटनेने परिसरातील रहिवासी धास्तावले असून, बिबट्याच्या दहशतीखाली राहात आहेत.वनविभागाने पिंजरा लावून लवकरात लवकर बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे. दिवसेंदिवस होत असलेली जंगलतोड व जंगलातील पाणवठे नष्ट होत असल्याने बहुतांशी वन्यप्राणी मानवी वस्त्यांकडे धाव घेत असल्याचे चित्र आहे. सद्यस्थितीत बिबट्या गावात येणे ही गोष्ट काही नवीन नसली तरी बिबट्यापासून होणारा उपद्रव भयभीत करणारा आहे. बिबट्या आला असे म्हटले तरी अंगावर काटे उभे राहतात. असाच काहीसा प्रकार उमराणे गावापासून दोन ते तीन कि.मी. अंतरावर असलेल्या खारीपाडा येथील रहिवाशांना येत आहे. तीन-चार दिवसांपूर्वी गावापासून जवळच असलेल्या काशीनाथ अहिरे व उत्तम शिरसाठ या शेतकऱ्यांच्या गोठ्यातील वासरे फस्त केले. त्यानंतर गुरुवारी पुन्हा एकदा रहिवाशांना दर्शन देत एका वासराचा फडशा पाडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. दरम्यान, वनपाल ए. ई. सोनवणे व वनरक्षक ए.टी. मोरे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आले. बिबट्याच्या हल्ल्यात मृत झालेल्या जनावरांचा पंचनामा करण्यात आला. (वार्ताहर)
बिबट्याने केली तीन वासरे फस्त
By admin | Published: March 04, 2017 12:16 AM