सिन्नर तालुक्यातील धोंडवीरनगर शिवारातील या शेतात आढळून आले होते बिबट्याचे तीन बछडे .
लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : तालुक्यातील धोंडवीरनगर शिवारातील कोलतीचा पाझर तलावाशेजारी एका शेतात दुपारी बिबट्याचे तीन बछडे आढळून आले आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिक व शेतकऱ्यात भीती व्यक्त होत आहे.तालुक्यातील धोंडवीरनगर शिवारातील कोलतीचा पाझर तलावाशेजारी तुकाराम नारायण पवार यांच्या विहिरीशेजारील आबाजी नारायण पवार यांच्या शेतात बाळकृष्ण पवार, सुनील पवार, गणेश पवार व काही महिला मका कापण्याचे काम करीत असताना अचानक बिबट्याचे तीन बछडे आढळून आले. ते बछडे पाहून याठिकाणी मादी बिबट्या असावा या शंकेने त्यांच्यात घबराट पसरली.चाहूल लागताच बिबट्याचे बछडे एकामागे एक शेजारील पाच एकरच्या मक्याच्या शेतात पळून गेले. पोलीसपाटील बाळासाहेब पवार व कृषिमित्र सुभाष शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी केली व वनविभागाशी संपर्क साधून माहिती देण्यात आली. शेतकऱ्यांनी शेतात जाताना एकटे जाऊ नये, लहान मुलांना पाठवू नये, महिलांनी शेतात काम करताना, एकट्याने जाऊ नये अशा सूचना वनविभागाच्या अधिकाºयांनी दिल्या असून, गुरेवाडी पाझर तलाव व परिसरातील शेतकºयांनी शेतात काम करताना खबरदारी बाळगावी, शेतात काम करण्यापूर्वी कशाचा तरी आवाज करून किंवा फटाके वाजवून शेतात प्रवेश करावा, अशा प्रकारच्या पूर्वसूचना वनविभागाने दिल्या आहेत.