साकोरा : मोटारसायकलवरून येत सोनसाखळी चोरणारे आता ग्रामीण भागातही फिरू लागले आहेत. मंगळवारी (दि.२४) सायंकाळी एका महिलेची तीन तोळ्याची पोत चोरून घेऊन जाताना काही तरुणांनी पाठलाग करून तीन चोरट्यांना चोप देऊन नांदगाव पोलिसांच्या ताब्यात दिले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील ग्रामीण भागात चोरी, घरफोडी, सोने तसेच पाळीव जनावरे चोरणारी टोळी कार्यरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. नांदगाव येथील शांती बाग, सुयोग काॅलनी येथे भरदिवसा घरफोडी, साकोरा, चांदोरा आदी भागांतून बैलजोडी, गायी तसेच कांदे विकून घरी परतणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना रस्त्यात गाठून पैशाची लूटमार झाली आहे. मात्र शोध लागत नसल्याने कोणीही पोलिसांत तक्रार दाखल करत नसल्याचे उपस्थित नागरिकांनी यावेळी सांगितले. मंगळवारी सायंकाळी साकोरा येथील महिला लता धरमचंद कासलीवाल, सायली कासलीवाल या सासू-सून आणि लहान मुलगा विवानसह एका मोटारसायकलवरून नांदगाव येथून साकोरा येथे घरी जात असताना मोरखडी बंधाऱ्यानजीक रस्त्याचे काम चालू असल्याचा फायदा घेत अचानक मागून एका मोटारसायकलवरून तिघांनी चालू गाडीवरील सायलीच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचून पळून जाण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. मात्र लगेच सासू लता कासलीवाल यांच्या गळ्यातील तीन तोळ्याची पोत खेचून पळ काढला. सदर प्रकार मागून येणाऱ्या साकोरा येथील काही तरुण मोटारसायकल चालकांच्या लक्षात येताच त्यांनी या चोरट्यांचा पाठलाग केला. साकोरा येथील काही तरुणांना सोबत घेत चांदोरा गावातील मित्रांना फोन करून सदर प्रकार सांगितला व दोन्ही गावांतील तरुणांनी बंदोबस्त करून त्यांना पकडून चांगलाच चोप दिला. समाज मंदिरात कोंडून ठेवले व विचारपूस करून चोरलेल्या सोन्याच्या पोतीचा तपास केला, मात्र ते फेकून दिल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्याजवळ चाॅपर व कटर आढळून आले. नंतर नांदगाव पोलिसांत माहिती देत पोलिसांच्या स्वाधीन केले. याबाबत कोपरगाव येथील रोहिदास कचरू पानसरे, रवींद्र वाल्मीक चव्हाण रा. खडकी व योगेश रमेश डेंबरे यांच्याविरुद्ध नांदगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक वाघमारे तपास करीत आहेत.