नाशिक : जिल्ह्यातील सहा नगरपंचायत, नगर परिषदाच्या अध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीचा वरचष्मा कायम राहिला.सहापैकी तीन अधिकृत व एक भाजपा अपक्ष अशा चार जागांवर भाजपा व पुरस्कृत नगराध्यक्ष, तर एकेका जागेवर शिवसेना व राष्ट्रवादीने बाजी मारली.सोमवारी (दि. ३०) झालेल्या चांदवड, देवळा, निफाड, पेठ, सुरगाणा व कळवण नगरपंचायत व नगर परिषदेच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडणुकीत सहा पैकी पाच ठिकाणी केवळ औपचारिकता बाकी होती. चांदवडला अपेक्षेप्रमाणे काल सकाळपर्यंत जोड-तोडीचे राजकारण सुरू होते. मात्र अखेरीस माजी आमदार कै.जयचंद कासलीवाल यांचे चिरंजीव भूषण कासलीवाल हे भाजपाचे नगराध्यक्ष, तर उपनगराध्यक्षपदी शिवसेनेच्या कविता उगले यांची वर्णी लागली. पेठ नगरपंचायतीत लता सातपुते या सेनेच्या नगराध्यक्ष, तर मनोज घोेंगे हे सेनेचेच उपनगराध्यक्ष झाले. निफाड नगरपंचायतीमध्ये भाजपाचे राजाराम शेलार नगराध्यक्ष, तर शिवसेनेच्या सुनीता कुंदे या उपनगराध्यक्ष झाल्या. देवळा नगरपंचायतीमध्ये शहर विकास आघाडीच्या धनश्री अहेर, तर उपनगराध्यक्षपदी अशोक अहेर यांची निवड करण्यात आली. सुरगाणा नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्ष पदी भाजपाच्या रंजना लहरे, तर उपनगराध्यक्षपदी शिवसेनेचे सचिन अहेर यांची निवड झाली. कळवण नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादीच्या सुनीता पगार यांची नगराध्यक्षपदी, तर राष्ट्रवादीच्याच अनिता महाजन यांची उपनगराध्यक्षपदी निवड करण्यात आली. सहा पैकी तीन ठिकाणी भाजपाचे नगराध्यक्ष, तर एका ठिकाणी भाजपा पुरस्कृत अपक्ष अशा चार ठिकाणी भाजपाचे नगराध्यक्ष, तर चार ठिकाणी शिवसेनेचे उपनगराध्यक्षांची निवड झाली. पेठ व कळवणला मात्र शिवसेना व राष्ट्रवादी कॉँग्रेसने त्यांचा दबदबा कायम राखला.(प्रतिनिधी)
जिल्ह्यात भाजपाचे तीन नगराध्यक्ष
By admin | Published: November 30, 2015 11:22 PM