सटाणा : येथील मर्चण्ट्स बँकेचे ज्येष्ठ संचालक डॉ. व्ही. के. येवलकर यांच्यासह तीन संचालकांनी पदाचा राजीनामा दिल्याने सहकार वर्तुळात खळबळ उडाली आहे. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व अध्यक्ष यांच्याकडे सुपुर्द केलेल्या राजीनाम्यात घरगुती व व्यक्तिगत कारणे दिली असली तरी यामागे गैरव्यवहाराचे कारण असल्याची चर्चा आहे. बँकेचे ज्येष्ठ संचालक डॉ. येवलकर यांच्यासह कल्पना राजेंद्र येवला व किशोर गहीवड यांनी आपल्या संचालकपदाचा राजीनामा बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सुपुर्द केला आहे. आगामी काळात बँकेच्या संचालक मंडळावर एचडीएफसी ग्रामीण बचत विमा योजनेच्या नुकसानीबाबत कारवाईची शक्यता असल्याने तिघांनी राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे. सत्ताधारी संचालकांच्या मनमानीला कंटाळून तिघांनी संचालकपदाचा राजीनामा दिल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यापूर्वीच रमेश देवरे व अशोक निकम यांना जिल्हा निबंधकांनी अपात्र ठरविले असताना आता पुन्हा तीन संचालकांनी राजीनामे दिल्याने सतरा संचालक संख्या असलेल्या मर्चण्ट्स बँकेत आता केवळ बारा संचालक उरले आहेत.नामपूर शाखेत झालेला गैरव्यवहार उघडकीस आणूनदेखील कोणत्याही प्रकारची कारवाई बँक प्रशासन करत नसल्याने तसेच गेल्या ४ आॅगस्ट रोजी नोकरभरतीची जाहिरात काढून यासाठी अनेक इच्छुकांनी अर्ज करूनही कोणत्याही प्रकारच्या मुलाखती न घेता बेकायदेशीर नोकरभरती केली गेल्याने तिन्ही संचालकांनी अशा गैरप्रकारांना कंटाळून राजीनामा दिला असल्याचे एका संचालकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले आहे.
सटाणा मर्चण्ट्स बॅँकेच्या तीन संचालकांचे राजीनामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2018 12:45 AM