दिंडोरी (नाशिक) - शहर व तालुक्यात अनेक गावांना मंगळवारी रात्री भूकंपाचे सौम्य धक्के बसले असून नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार नाशिकपासून 15 ते 20 किमी अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू असून दिंडोरी तालुक्यात जाणवलेले धक्के भूकंपाचे असल्याचा प्रशासनाने दुजोरा दिला आहे.
मेरी भुकंपमापक केंद्राच्या अहवालानुसार पहिला धक्का रात्री 8.58 वाजता 3.4 रिश्टर स्केल, दुसरा धक्का 9.34 वाजता 2.1 रिश्टर स्केल तर तिसरा 9.42 वाजता 1.9 रिश्टर स्केल तीव्रतेचा होता. भूकंपाच्या या धक्क्यांमुळे कोणतेही नुकसान झालेले नाही. नागरिकांनी घाबरून जावू नये. मात्र सावधानता बाळगावी असे आवाहन प्रांताधिकारी डॉ.संदीप आहेर, तहसीलदार पंकज पवार यांनी केले आहे. तालुक्यातील दिंडोरी शहर, मडकीजांब, हातनोरे, निळवंडी, जांबुटके, उमराळे (बु), तळेगाव, वनारवाडी, पाडे परिसरात रात्री 8.58 ते 9.45 दरम्यान भूकंपाचे तीन धक्के जाणवले. तसेच या वेळी मोठा आवाज झाला. नागरिकांनी एकमेकांना फोन करत कुठे कुठे धक्के बसल्याची माहिती घेतली.
याबाबत प्रांताधिकारी डॉ.संदीप आहेर तहसीलदार पंकज पवार यांनी माहिती घेत मेरी केंद्र तसेच जिल्हाधिकारी कार्यालय आपत्ती व्यवस्थापन विभागास याबाबत कळविण्यात आले. मेरी केंद्राकडून सदर घटनेला दुजोरा मिळत 3.4 रिश्टर स्केलचे रात्री 9.58 मिनिटांनी पहिला धक्का बसल्याची नोंद झाली असून केंद्रबिंदू नाशिकपासून 16 ते 20 किमी असल्याचे सांगण्यात आल्याची माहिती प्रांताधिकारी डॉ.संदीप आहेर यांनी दिली. नागरिकांनी घाबरून जावू नये मात्र काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.